Amazon

सुरगाण्यात ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप; नाशिक शहरापासून ५३ किलोमीटरवर केंद्रबिंदू

नाशिक। दि. २० सप्टेंबर २०२६: नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवण्याचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी पुन्हा ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदविण्यात आला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली अवघ्या चार किलोमीटर खोलीवर असल्याने परिसरातील नागरिकांना हादरे जाणवले. या घटनेमुळे सुरगाणा परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार; सोमवारी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) नोंदीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिक शहरापासून सुमारे ५३ किलोमीटर उत्तर-पश्चिमेस, शिंदे-रोकडपाडा परिसरात असल्याचे नोंदविण्यात आले आहे. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत दोन तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, दिंडोरी आणि पेठ या तालुक्यांमध्ये यावर्षी आतापर्यंत भूकंपाचे २२ धक्के नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात नऊ धक्के जाणवले. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा सर्वाधिक धक्का बसला होता. त्या वेळी काही घरांना तडे गेल्याचे समोर आले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: श्री साक्षी गणेश मंदिरात आज सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

सप्टेंबर महिन्यातही आतापर्यंत तीन भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वारंवार जाणवणाऱ्या या धक्क्यांमुळे प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790