Amazon

नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

नाशिक। दि. २० सप्टेंबर २०२६: मुंबईनाका परिसरातील सातत्याची वाहतूककोंडी कमी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महामार्ग बसस्थानकाच्या बंद असलेल्या दुसऱ्या प्रवेशद्वाराचा प्रायोगिक वापर केल्यानंतर आता स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांचा स्वतंत्रपणे कायमस्वरूपी वापर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे एसटी बसच्या ये-जा करण्याच्या मार्गात बदल होणार असून, मुंबईनाका सर्कलवरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.

मुंबईनाका परिसरातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. काही महिन्यांपूर्वी परिसरातील व्यावसायिकांचे अतिक्रमणही हटविण्यात आले होते. त्यातच द्वारका परिसरातील भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्याने मुंबईनाक्यावर पर्यायी मार्गावरील वाहतुकीचा अतिरिक्त भार वाढला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत दोन तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास

निमाणी बसस्थानकाच्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे निमाणी, मेळा आणि ठक्कर बाजार येथून सुटणाऱ्या सिटीलिंक बसही मुंबईनाका परिसरातून मार्गस्थ होत आहेत. याशिवाय एसटी बसचीही ये-जा मुंबईनाका सर्कलमधून होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे.

बंद प्रवेशद्वाराचा कायमस्वरूपी वापर:
वाहतूककोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने १९ सप्टेंबर रोजी एसटी महामंडळाला महामार्ग बसस्थानकाचे दुसऱ्या बाजूचे बंद प्रवेशद्वार उघडून महिनाभर प्रायोगिक तत्त्वावर वापरण्याची सूचना केली होती. या प्रयोगाचा विचार करून आता या व्यवस्थेला मुदतवाढ देण्याऐवजी दोन्ही प्रवेशद्वारांचा स्वतंत्र वापर कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर जाहिरातींना अडसर ठरतात म्हणून ५५ झाडे तोडली; सहा जणांना अटक

चांडक सर्कलकडे जाणाऱ्या रस्त्यावर गायकवाडनगरलगत असलेले प्रवेशद्वार आता कायमस्वरूपी खुले ठेवण्यात येणार आहे. या प्रवेशद्वारातून महामार्ग बसस्थानकातील एसटी बसेस बाहेर पडतील.

चांडक सर्कलमार्गे गडकरी चौकाकडे जाणे बंधनकारक:
नवीन प्रवेशद्वारातून बाहेर पडणाऱ्या एसटी बस चालकांना डावीकडे वळून चांडक सर्कलमार्गे शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्याने गडकरी चौक सिग्नलपर्यंत जावे लागणार आहे. त्यानंतर गडकरी चौकातून पुढे पुणे महामार्ग तसेच मुंबईच्या दिशेने बस रवाना होतील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एफडीएकडून ४८ लाखांचा फ्राइड कांदा आणि तेलाचा साठा जप्त

तुपसाखरे लॉन्सजवळील ‘यू-टर्न’ला आळा:
दरम्यान, चांडक सर्कलमार्गे गडकरी चौकाकडे जाण्याऐवजी काही एसटी बसचालक तुपसाखरे लॉन्सजवळील अरुंद चौकातून ‘यू-टर्न’ घेऊन पुन्हा महामार्ग बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराकडे येत असल्याचे वाहतूक शाखेच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे बस वळवल्याने दोन्ही बाजूंना वाहतूककोंडी निर्माण होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

त्यामुळे एसटी बस चालकांनी चांडक सर्कलमार्गे गडकरी चौकाकडे जाण्याच्या निर्धारित मार्गाचे पालन करणे आवश्यक करण्यात आले आहे. अनधिकृत ‘यू-टर्न’मुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी मार्गाची सक्ती करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790