नाशिक। दि. २० सप्टेंबर २०२६: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘ठेवा संस्कृतीचा’ उपक्रमातर्फे रविवारी (दि. २०) भद्रकाली येथील श्री साक्षी गणेश मंदिरात सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात महिलांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग राहणार असून, २१ अथर्वशीर्षांचे सामूहिक पठण, गणेशवंदना आणि सामुदायिक अर्चना करण्यात येणार आहे.
भारतीय संस्कृतीतील सण, परंपरा आणि धार्मिक प्रथा यांचे जतन करून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘ठेवा संस्कृतीचा’ उपक्रम सुरू करण्यात आला. यंदा या उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या दशकभरात गणेशोत्सव, नवरात्रासह विविध सण सामूहिक स्वरूपात साजरे करण्यात आले आहेत.
कोरोना महामारीच्या काळातही उपक्रमाचे सातत्य खंडित झाले नाही. त्या काळात प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने ऑनलाइन सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन गायत्री बेळगे, वैशाली साठे, मनाली गर्गे, गीतांजली आव्हाड आणि वैशाली शुक्ल करीत आहेत. महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेविका मयूरी पवार आणि संस्थापिका पल्लवी पटवर्धन यांनी केले आहे.
![]()


