नाशिक, दि. २३ ऑगस्ट २०२६: लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवत अडचणी दूर करण्यासाठी स्मशानभूमीत अघोरी पूजा करावी लागेल, असे सांगून एका ३४ वर्षीय महिलेची ७७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकच्या जुने नाशिक परिसरातील अमरधाम स्मशानभूमीत समोर आला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी कथित भोंदूबाबासह दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधी कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील पीडित महिला गुजरातमधील वलसाड येथील रहिवासी आहे. तिच्या तक्रारीनुसार, जितू अण्णाराव पवार आणि विशाल रामदास खंडागळे (रा. पंचवटी) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
पीडित महिलेची जितू पवार याच्याशी नातेवाईक म्हणून ओळख होती. त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पवार हा फुलेनगर परिसरात विशाल खंडागळे याच्याकडे राहत असून, त्याच्याकडून तथाकथित भोंदूगिरी शिकत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी जितू पवार याने महिलेला मारहाण करून दमदाटी केली होती. याबाबत तिने विशाल खंडागळेकडे तक्रार केली. त्यावेळी ‘स्मशानभूमीत पूजा केल्यास जितू व्यवस्थित वागेल आणि लग्न करेल’, असे सांगून तिच्याकडून पैसे उकळण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे.
अर्ध्या रात्री स्मशानभूमीत विधी:
पीडित महिला १२ जुलै रोजी वलसाडहून नाशिकला आली होती. त्याच रात्री साडेअकराच्या सुमारास तिला जुने नाशिक येथील अमरधाम स्मशानभूमीत एका मंदिरासमोर नेण्यात आले. तेथे मध्यरात्रीच्या सुमारास लोखंडी जाळीवर लिंबू, हळद-कुंकू आणि लाह्या ठेवून मंत्रोच्चार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
त्यानंतर महिलेच्या अंगावरून लिंबू उतरवून नदीत सोडण्यात आले आणि पूजा पूर्ण झाल्याचे तिला सांगण्यात आले. मात्र, या विधीनंतरही जितू पवार याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.
महिलेने याबाबत विचारणा केली असता, आणखी पूजा करावी लागेल तसेच जितूला हळद लावावी लागेल, असे सांगून पुन्हा पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. अशाप्रकारे एकूण ७७ हजार रुपये घेतल्यानंतरही लग्न न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनीही पोलिसांची भेट घेऊन पीडित महिलेला आधार दिला आणि कठोर कारवाईची मागणी केली. ‘अंनिस’चे राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या सूचनेनुसार भद्रकाली पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (भद्रकाली पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३४५/२०२६)
![]()


