नाशिक: ‘आईला २५ हजार देतो’ म्हणत तरुणीला जाळ्यात ओढले; बनावट लग्नातून २ लाख उकळले

नाशिक। दि. २३ ऑगस्ट २०२६: जेलरोड परिसरातील एका तरुणीला तिच्या आईला २० ते २५ हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून खोटे बोलण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर तिचे बनावट लग्न लावून देत मुलाच्या कुटुंबीयांकडून तब्बल दोन लाख रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, ठरल्याप्रमाणे तरुणीच्या आईला पैसे न देता तिचीही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भद्रकाली मंदिरातील सिंहाची मूर्ती चोरीला; तासाभरात दोघे ताब्यात

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, १२ ऑगस्ट रोजी दुपारी जेलरोड येथील दसक शिवारात माधव कारभारी वाघ याने संबंधित तरुणीला तिच्या आईला २० ते २५ हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर अमोल दादा कदम ( राहणार: माणेगाव, सांगोला) याच्याशी लग्न करण्यासाठी तिला खोटी माहिती सांगण्यास प्रवृत्त करण्यात आले.

यानंतर वाघ याने दादा जयवंत कदम आणि त्यांच्या नातेवाइकांकडून दोन लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. संबंधित तरुणीला अमोल कदम आणि त्याच्या नातेवाइकांसोबत माणेगाव (ता. सांगोला) येथे पाठवण्यात आले. विशेष म्हणजे, तरुणीला कदम कुटुंबीयांची पूर्वीपासून ओळख नव्हती. मात्र, त्यांनी तिच्याशी कोणताही गैरप्रकार केला नसल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: लग्नासाठी अघोरी पूजा ! अर्ध्या रात्री स्मशानात नेले, महिलेची ७७ हजारांची फसवणूक

या कथित बनावट विवाहासाठी तरुणीला खोटे नाव आणि खोटी माहिती सांगण्यास भाग पाडण्यात आले. अंजना राजेंद्र देवरे हिने तरुणीची खोटी आई, तर राहुल गबा शेळके याने खोटा मामा म्हणून भूमिका बजावल्याचा आरोप आहे. या माध्यमातून कदम कुटुंबीयांची फसवणूक करण्यात आली. तसेच तरुणीच्या आईला देण्याचे आश्वासन दिलेले पैसेही न देता तिची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वीजचोरीविरोधात महावितरणची धडक कारवाई; एकाच दिवशी १४ जणांवर गुन्हे दाखल

याप्रकरणी माधव कारभारी वाघ, अंजना राजेंद्र देवरे, राहुल गबा शेळके (सर्व रा. नाशिक) आणि शिल्पा मनोहर बनकर (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५१७/२०२६)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790