नाशिक। दि. २४ जुलै २०२६: अतिमुसळधार पावसामुळे कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील अनेक रस्त्यांवर भूस्खलन होऊन झाडे कोसळल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अभयारण्यातील वर्षा पर्यटन तात्पुरते बंद करण्यात आले आहे. नाशिक वन्यजीव विभागाने गुरुवारी (दि. २३) हा निर्णय जाहीर केला.
नाशिक-अहिल्यानगर सीमेवरील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य हे पावसाळी पर्यटनासाठी राज्यभर प्रसिद्ध असून, दरवर्षी हजारो पर्यटक येथे धबधबे आणि निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी येतात. भंडारदरा आणि राजूर वनपरिक्षेत्रातील वसुंधरा, कोलटेंभे, न्हाणी, नेकलेस, वैशाली, पांजरे, वनराई, निसर्ग, स्माइली, रिव्हर्स, अमृतेश्वर, प्रवरा आणि गडदूआई यांसारखे धबधबे सध्या दुथडी भरून वाहत आहेत.
मात्र, गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने अभयारण्यातील अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळली असून, काही भागांत भूस्खलनही झाले आहे. मुतखेल वन तपासणी नाक्यापासून रतनवाडीपर्यंत तसेच शेंडी तपासणी नाक्यापासून घाटघर आणि साम्रद मार्गावर दगड-माती रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
याशिवाय धबधब्यांचा पाण्याचा वेग आणि दाब धोकादायकरीत्या वाढल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करून परिस्थिती सामान्य होईपर्यंत अभयारण्यातील वर्षा पर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांनी दिली.
दरम्यान, पावसाळ्याच्या कालावधीत अभयारण्यातून होणारे सर्व ट्रेकही बंदच राहणार आहेत. हरिश्चंद्रगड, रतनगड, सांदण व्हॅली, आजोबा पर्वत, अलंग, कुलंग, मदनगड, भैरवगड, कुंजरगड आणि पाभरगड यांसह सर्व ट्रेकिंग मार्गांवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
वन्यजीव विभागाने पर्यटक आणि ट्रेकर्सना कोणत्याही अनधिकृत मार्गाने अभयारण्यात प्रवेश किंवा ट्रेकिंगचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.
![]()


