नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

नाशिक। दि. २४ जुलै २०२६. दु. ३.३० वा.: गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमानाची नोंद होऊनही प्रशासनाने वेळेवर केलेल्या उपाययोजना, विविध यंत्रणांतील प्रभावी समन्वय आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली असून कोणतीही जिवितहानी अथवा मोठी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली नाही. पावसाचा जोर कमी झाला असला तरी संभाव्य धोका अद्याप टळलेला नसल्याने नागरिकांनी सतर्कता कायम ठेवून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, ॲड.आमदार राहुल ढिकले, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, नाशिक पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, पोलीस उपायुक्त किशोर काळे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, गेल्या तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे काही भागांत पाणी साचणे व स्थानिक स्वरूपाचे नुकसान झाले असले तरी प्रशासनाच्या तातडीच्या प्रतिसादामुळे कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य केल्यामुळे मोठी आपत्ती टळली असून त्याबद्दल त्यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

आज हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला ग्रीन अलर्ट दिला असला तरी संभाव्य धोका पूर्णपणे संपलेला नाही. ज्या इमारती किंवा परिसरात अद्याप पाणी साचलेले आहे, तेथील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. पावसानंतर डेंग्यू, कॉलरा यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा. तसेच महानगरपालिका प्रशासनाने स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यांचे प्रभावी नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळे, धबधबे आणि नदीकाठ परिसरात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. नागरिकांनीही धोकादायक ठिकाणी जाणे टाळून स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

गोदावरी नदीपात्रात सुमारे 19 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तो सामान्य स्थितीत येण्यास वेळ लागणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रामकुंड परिसर पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी दिली. या परिसरातील नागरिकांनी तसेच भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल, पोलीस, महानगरपालका व संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790