नाशिक: भोंदू अशोक उर्फ ‘कॅप्टन’ खरातविरुद्ध ईडीचे ३ हजार पानी दोषारोपपत्र; ४२.८८ कोटींच्या अपहाराचा ठपका

नाशिक। १९ जुलै २०२६: भक्तांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची आर्थिक लूट केल्याचा आरोप असलेल्या भोंदू अशोक उर्फ ‘कॅप्टन’ खरातविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईतील विशेष न्यायालयात तब्बल तीन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रात खरातसह सहा संशयितांविरुद्ध विविध पुरावे सादर करण्यात आले असून प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार आहे.

ईडीच्या तपासानुसार, अशोक खरातने अलौकिक शक्ती असल्याचा दावा करत भक्तांची फसवणूक केली आणि सुमारे ४२ कोटी ८८ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

या प्रकरणात अशोक खरातसह अरविंद बावके, नामकरण आवारे, अनिवाश कांडेकर, मिलिंद बनकर आणि कल्पना खरात (पत्नी) यांचाही संशयित म्हणून समावेश करण्यात आला आहे.

दोषारोपपत्रात नमूद केल्याप्रमाणे, खरात साध्या चिंचेच्या बियांना चमत्कारी वस्तू असल्याचे भासवून प्रत्येकी दोन लाख रुपयांपर्यंत विक्री करत होता. तसेच बनावट खडे आणि मधाच्या बाटल्याही लाखो रुपयांना विकून भक्तांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

यापूर्वी २५ मार्च रोजी सरकारवाडा पोलिस ठाण्यात खरातविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ६ एप्रिल रोजी ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ अंतर्गत स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि राहाता येथे त्याच्याविरुद्ध एकूण १७ गुन्हे दाखल असून तपासादरम्यान ईडीने ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

दोषारोपपत्रातील महत्त्वाचे आरोप

  • अलौकिक शक्तींचा दावा करून भक्तांची आर्थिक फसवणूक.
  • भक्तांना प्रभावित करण्यासाठी रिमोट कंट्रोलने चालणारे साप आणि वाघाच्या कातडीचा वापर.
  • आर्थिक व्यवहार लपवण्यासाठी तब्बल १४२ बनावट बँक खाती उघडल्याचा आरोप.
  • महिलांच्या अडचणींचा गैरफायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप.

या सर्व आरोपांबाबत अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतर होणार असून, सध्या दोषारोपपत्रातील आरोप हे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790