नाशिक। दि. ८ सप्टेंबर २०२६: चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत प्रॉपर्टी ब्रोकरकडून तब्बल २ लाख २० हजार रुपये खंडणी उकळल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सद्दाम बाबू शेख याच्यासह त्याच्या दोन साथीदारांविरोधात तसेच ‘मामू’ नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गणेश महेश झाल्टे (३९, रा. साईनगर, अमृतधाम, पंचवटी) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२४च्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑगस्ट २०२६च्या पहिल्या आठवड्यापर्यंत ट्रॅक्टर हाउस आणि खडकाळी सिग्नल परिसरात विविध टप्प्यांत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
झाल्टे हे कामानिमित्त ट्रॅक्टर हाउस परिसरातून रामकुंडकडे जात असताना संशयितांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत त्यांच्या टोळीला दरमहा २० हजार रुपये हप्ता देण्याची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर झाल्टे यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्यांना सुमारे दोन तास जबरदस्तीने रोखून ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
यानंतर ‘मामू’ नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून २२ डिसेंबर २००३ रोजीचे साठेखत मागवून घेण्यात आले. चाकूचा धाक दाखवत या दस्तऐवजावर फिर्यादीच्या वडिलांचे नाव साक्षीदार म्हणून नमूद करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादीची जबरदस्तीने सही घेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, झाल्टे यांनी हप्ता देणे बंद केल्यानंतर ऑगस्ट २०२६च्या पहिल्या आठवड्यात संशयितांनी त्यांना खडकाळी सिग्नल परिसरात पुन्हा गाठले. आरोपी आणि त्याचा एक साथीदार बीएमडब्ल्यू कारमधून तेथे आले. त्यांनी झाल्टे यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांच्या पोटाला चाकू लावला. शिवीगाळ व मारहाण करत झाल्टे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत आणखी एक लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. (भद्रकाली पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३५९/२०२६)
अशा प्रकारे विविध टप्प्यांत २ लाख २० हजार रुपये खंडणीच्या स्वरूपात वसूल केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
![]()


