नाशिक: डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटचे आमिष; महिलेची तब्बल ९.७५ लाखांची ऑनलाइन फसवणूक

नाशिक। दि. १७ जुलै २०२६: डॉक्टरांची अपॉइंटमेंट बुक करून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी एका महिलेच्या मोबाईलमध्ये बनावट अॅप इन्स्टॉल करून तिच्या बँक खात्यांवर ताबा मिळवला. त्यानंतर खातेदाराची कोणतीही परवानगी न घेता ९ लाख ७५ हजार ६०१ रुपये ऑनलाइन वळते करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून ते ५ जुलै २०२६ या कालावधीत एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फिर्यादी यांच्या पत्नीशी संपर्क साधण्यात आला. डॉक्टरांची अपॉइंटमेंट निश्चित करून देण्याच्या नावाखाली संबंधित व्यक्तीने त्यांच्या मोबाईलमध्ये एक अॅप डाउनलोड व इन्स्टॉल करण्यास सांगितले.

हे अॅप इन्स्टॉल होताच सायबर भामट्याने दूरस्थ (Remote) पद्धतीने मोबाईल आणि बँकिंग व्यवहारांवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर बँक ऑफ बडोदा आणि एचडीएफसी बँक येथील खात्यांतून टप्प्याटप्प्याने एकूण ९,७५,६०१ रुपये विविध व्यवहारांद्वारे परस्पर वळते करून आर्थिक फसवणूक करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, संबंधित मोबाईल क्रमांकधारकाचा शोध सुरू आहे.

सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

सायबर गुन्हे टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणतेही अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नये, तसेच बँकिंगशी संबंधित कोणतीही माहिती, ओटीपी किंवा मोबाईलचा रिमोट ॲक्सेस अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790