Amazon

गंगापूर रोडवरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यासाठी पर्यायी समांतर मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक। दि. २७ ऑक्टोबर २०२६: नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील वाढती वर्दळ रोखण्यासाठी गंगापूर रोडला समांतर पर्यायी मार्ग म्हणून विकसित करण्यात येणारा स्व. मातोश्री अनुसयाबाई रामदास शिंदे मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सोमवारी कॅनॉल रोड परिसर, तिरूमाला हाईटस्, पाईपलाईन रोड, गंगापूर रोड येथे गंगापूर रोडला नवीन समांतर मार्गाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, शहराचा वाढता विस्तार आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग विकसित करणे आवश्यक आहे. गंगापूर रोडवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कॅनॉल रोडचा उपयोग होणार असून, त्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होईल. रस्ते विकासाच्या माध्यमातून वाहतुकीचे नियोजन अधिक प्रभावी करता येणार असून, अपघातांचा धोका कमी करण्यासाठीही अशा पायाभूत सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पासाठी ६५.९१ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नाशिक परिक्षेत्रात 1 नाव्हेंबरपर्यत दक्षता जनजागृती सप्ताह

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि अन्य पायाभूत सुविधांचा विकास गतीने करण्यात येत आहे. कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, विविध विकास कामे सुरू आहेत. देशभरातून मोठ्या संख्येने भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, वाहतूक सुरळीत ठेवणे ही सर्व संबधित यंत्रणांची जबाबदारी आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या टपाल कार्यालयात 5 नोव्हेंबर रोजी डाक अदालत

कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली कामे गुणवत्तापूर्ण, नियोजनबद्ध पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. रस्त्यांची गुणवत्ता, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. विकास कामांमध्ये विविध विभागांनी समन्वयाने काम करून नाशिक शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

संत कबीरनगर परिसराला झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दृष्टीने गृहप्रकल्प राबविण्यासाठी परिसरातील नागरिकांना चांगली घरे आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले.

राज्यात गेल्या काही वर्षांत विविध महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून, त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यासह दळणवळण अधिक सुलभ झाले आहे. समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पांमुळे नाशिकसह विविध शहरांमधील संपर्कव्यवस्था सुधारण्यास मदत झाली आहे. याच धर्तीवर नाशिक शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर शासनाचा भर आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शंखनादाच्या विश्वविक्रमाने दुमदुमला गोदाकाठ; अमेरिकेचा ३०३ शंखवादकांचा विक्रम मोडला

यावेळी जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, महापौर हिमगौरी आडके, आमदार गोकुळ गिते, आमदार सीमा हिरे, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, गटनेते अजय बोरस्ते, नगरसेविका उषा बेंडकुळे, नयना गांगुर्डे, कमलेश बोडके, प्रमोद पालवे, कविता लोखंडे, अंकिता शिंदे, संतोष गायकवाड यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790