Amazon

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नाशिक परिक्षेत्रात 1 नाव्हेंबरपर्यत दक्षता जनजागृती सप्ताह

नाशिक। दि. २७ ऑक्टोबर २०२६: भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, पारदर्शकता आणि सचोटीची मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने नाशिक परिक्षेत्रात ‘दक्षता जनजागृती सप्ताह 1 नोव्हेंबर, 2026 पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या आयोजित या सप्ताहांतर्गत दक्षता-समृध्दी साठी सत्यनिष्ठा या संकल्पनेंतर्गत नागरिकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सातपूरला कंपनीत क्रेनचा धक्का लागून तरुण कामगाराचा मृत्यू

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पोलीस अधिकारी व अंमलदारांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देऊन सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रदिप मैराळे, कविता फउतरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशांचे वाचन करण्यात आले.

दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने नाशिक परिक्षेत्रातील विविध शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि ग्रामीण भागात जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत भ्रष्टाचारविरोधी संदेश देणारे पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात येणार असून, शाळा व महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, चर्चासत्रे आणि अन्य जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून लाचेची मागणी अथवा भ्रष्टाचारासंबंधी गैरप्रकार आढळून आल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. तांगडे यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक महानगर प्रदेशात नियोजित विकासासाठी भूखंडधारकांना नगररचना योजनेत सहभागाची संधी

नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४, तसेच विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाचा acbmaharashtra.gov.in आणि ऑनलाइन तक्रार पोर्टलचा acbmaharashtra.net वापर करता येईल. तक्रारीसाठी ई-मेल spacbnashik@mahapolice.gov.in या पत्त्यावर दुरध्वनी क्र. 0253-2575628, 2578230 व व्हाट्स ॲप क्रमांक 9545651064 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनातील पारदर्शकता आणि सचोटीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपअधिक्षक श्री. पैलकर यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790