नाशिक। दि. १६ जुलै २०२६: शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनी येथील डेजी वेलनेस स्पा सेंटरवर गंगापूर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या कथित देहव्यापाराचा पर्दाफाश झाला.
या कारवाईत तीन परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली असून, स्पा सेंटरच्या मालक महिला, व्यवस्थापक तसेच घटनास्थळी आढळून आलेल्या दोन ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना या स्पा सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार प्रचीती गोसावी यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, स्पा सेंटरची मालक कविता पवन कोरडे (वय ४३, रा. रुक्मिणी सोसायटी, मखमलाबाद रोड, पंचवटी), व्यवस्थापक अर्चना संजय मोरे (वय ३२, रा. आनंदछाया बसस्टॉपजवळ, सातपूर), तसेच ग्राहक आशुतोष चंद्रकांत अमृते (वय ४५, रा. माणेकशानगर, द्वारका) आणि रवी भागवत (वय ४२, रा. मखमलाबाद गाव) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालक आणि व्यवस्थापक यांनी संगनमत करून तीन परप्रांतीय महिलांकडून ग्राहकांना लैंगिक सेवा पुरवून त्याबदल्यात पैसे स्वीकारत अनैतिक व्यवसाय चालविल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. छाप्यादरम्यान संबंधित महिला आणि ग्राहक प्रत्यक्ष आढळून आले.
या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) अधिनियम १९५६ च्या कलम ३,४,५ आणि ६ नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कवाद करीत आहेत. (गंगापूर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३२४/२०२६)
![]()


