नाशिक: स्मार्ट मीटरची मिळणार उपयुक्त माहिती; शनिवारी (दि. १८) ग्राहक संवाद मेळावे

नाशिक। दि. १७ जुलै २०२६: स्मार्ट (टिओडी) मीटरबाबत वीज ग्राहकांशी संवाद साधून असलेले गैरसमज दूर करून तसेच स्मार्ट मीटर संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी शनिवार दिनांक १८ जुलै रोजी महावितरणच्या नाशिक परिमंडळात सर्व उपविभागीय कार्यालयांमध्ये ग्राहक संवाद मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांमध्ये स्मार्ट मीटरचे फायदे, वैशिष्ट्ये, कार्यपद्धती आणि अचूकतेविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

स्मार्ट (टिओडी) मीटर हे पूर्णतः अचूक असून सामान्य वीज ग्राहकांसाठी फायदेशीर असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळविण्यासाठी स्मार्ट टिओडी मीटर उपयुक्त ठरत आहेत. औद्योगिक ग्राहकांकडे अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे मीटर वापरात असल्याने वीज ग्राहकांनी मेळाव्यांना उपस्थित राहून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  आषाढी एकादशीनिमित्त नाशिक विभागातून ३०० जादा एसटी बसेस; २० ते ३० जुलैदरम्यान विशेष नियोजन

परिमंडळातील सर्व ७२ उपविभागात करण्यात येणार मेळाव्याचे आयोजन:
महावितरणच्या नाशिक परिमंडळांतर्गत नाशिक मंडळातील २८, मालेगांव मंडळातील १५ आणि अहिल्यानगर मंडळातील २९ अशा एकूण ७२ उपविभागीय कार्यालयांमध्ये शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत ग्राहक संवाद मेळावा पार पडणार आहे. मेळाव्यांना संबंधित महावितरणचे कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकरी अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. तसेच स्मार्ट मीटर संदर्भात असलेल्या शंकेचे व वीज देयक तक्रारींची तपासणी करून त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जवाहर नवोदय विद्यालयाची 28 नोव्हेंबरला निवड चाचणी परीक्षा; जिल्ह्यात 40 केंद्रावर परीक्षेचे आयोजन

परिमंडळातील ७ लाख ६५ हजार ग्राहकांकडे स्मार्ट(टिओडी) मीटर:
नाशिक परिमंडळात आतापर्यंत एकूण ७ लाख ६५ हजार ७०९ सर्व वर्गवारीच्या वीज ग्राहकांकडे स्मार्ट (टिओडी) मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक मंडळात ३ लाख ३८ हजार ८५५, मालेगांव मंडळात १ लाख १५ हजार ३७३ आणि अहिल्यानगर मंडळात ३ लाख ११ हजार ४८१ मीटरचा समावेश आहे. स्मार्ट मीटरचे फायदे व माहिती जाणून घेतल्यानंतर नाशिक परिमंडळातील मोठ्या प्रमाणात वीज ग्राहकांनी स्वेच्छेने स्मार्ट मीटर बसविण्यासाठी ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे.

🔎 हे वाचलं का?:  भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्ला; अटक केलेल्या नऊ संशयितांना १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

मेळाव्या व्यतिरिक्त या ठिकाणी दाखल करता येणार तक्रारी:
स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत किंवा कुठल्याही कारणाने आलेल्या वाढीव वीजबिलांबाबतच्या तक्रारींचे महावितरणकडून प्राधान्याने निराकरण करण्यात येणार आहे. ग्राहकांनी महावितरणचे संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲप तसेच १९१२ / १९१२०/ १८००-२१२-३४३५ आणि १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर तक्रारी नोंदवाव्यात, तसेच या संवाद मेळाव्याचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790