नाशिक: अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण वृत्तीचा स्वीकार करावा- पोलिस महासंचालक सदानंद दाते

नाशिक। दि. १० जून २०२६: पोलिस सेवेत येणाऱ्या अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण ही त्रिसुत्री अंगीकारत कायद्याचे रक्षक आणि समाजाचे संवेदनशील सेवक व्हावे, असे आवाहन राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी केले.

महाराष्ट्र पोलिस अकादमीत मंगळवारी (दि.९) सकाळी प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक सत्र क्रमांक १२७ चा दीक्षांत संचलन सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ४२० पुरुष (गोवा राज्यातील एक प्रशिक्षणार्थीसह) व १६३ महिला असे एकूण ५८३ प्रशिक्षणार्थ्यांनी १२ महिने कालावधीचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र पोलिस दलात दाखल झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. १० जून) वीजपुरवठा बंद राहणार…

अकादमीचे संचालक नवल बजाज उपस्थित होते. त्यांनी पोलिस दलात दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी उपस्थित होते.

पोलिस महासंचालक श्री. दाते म्हणाले की, गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात पोलिसांनी मोठे यश मिळविले आहे. आता तेथील जनतेच्या मनात सुरक्षेबरोबरच सेवेची भावना रुजविण्याचे महत्वपूर्ण परिवर्तन घडवून आणावयाचे आहे. गुन्हेगारीचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे. सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. या आव्हांनाना सामोरे जाण्यासाठी पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज आहे.

अमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी तरुण अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी. कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान आणि समस्या सोडविण्याची क्षमता ही पदापेक्षा अधिक महत्वाची ठरते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सांघिक भावनेने काम करावे. पोलिस दलाची खरी ताकद जनतेचा पोलिसांवरील विश्वासात असते. नागरिक पोलिस ठाण्यात कायदेशीर मदतीबरोबरच न्याय आणि सुरक्षितता शोधत येतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कायद्याचे रक्षक आणि समाजाचे संवेदनशील सेवक बनावे. प्रत्येक पोलिस हा गणवेशातील नागरिक असून नागरिक हा गणवेश नसलेला पोलिस आहे ही भावना समाजामध्ये रुजवावी, असे आवाहनही पोलिस महासंचालक श्री. दाते यांनी केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एस.टी. बसस्थानक परिसरात २०० मीटर 'नो पार्किंग झोन'ची प्रभावी अंमलबजावणी

पारितोषिक विजेते प्रशिक्षणार्थी:
👉 रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर, कै. यशवंतराव चव्हाण सुवर्ण करंडक (सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी), अहिल्याबाई होळकर करंडक (सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी) : उत्कर्षा शशिकांत जाधव.
👉 द्वितीय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी : मोहन चमाबाई मच्छिंद्र पालमपल्ली.
👉 कायदा विषयात सर्वोत्कृष्ट (डॉ. बी. आर. आंबेडकर करंडक) : अमृता माया सुभाष जाधव.
👉 सर्वोत्कृष्ट नेमबाज (एन. एम. कामटे सुवर्ण करंडक) : राजू जया दत्तात्रय जाधव.
👉 सर्वोत्कृष्ट कवायत : बळिराम धोंडूबाई मानेजी बुडसे
👉 सर्वोत्कृष्ट अभ्यास (सिल्व्हर बॅटन) : वैशाली सविता अर्जुन शेळके

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांची भरती

दीक्षांत सोहळ्यासाठी सहसंचालक नंदकुमार ठाकूर, उपसंचालक (बाह्य वर्ग) प्रशांत खैरे, उपसंचालक (प्रशिक्षण) गीता चव्हाण, उपसंचालक (सेवांतर्गत प्रशिक्षण) महेश चिमटे, उपसंचालक (आयटी व सुरक्षा) पद्मजा चव्हाण- बढे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790