नाशिक: ओझर विमानतळाच्या विस्तारीत बांधकामास मंजुरी

नाशिक। दि. २० मे २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम राज्य शासनातर्फे सुरू आहे. या विस्तारीत कामाच्या बांधकामास नवी दिल्ली येथील नागरी विमान सुरक्षा विभागाच्या महासंचालकांनी मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र मुख्य सुरक्षा अधिकारी, ओझर विमानतळ यांना प्राप्त झाले आहे. या निर्णयामुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामास आता वेग येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी ५६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे ओझर विमानतळाच्या प्रवासी क्षमतेत तीनपट वाढ अपेक्षित आहे.

या पार्श्वभूमीवर विमानतळ विस्तारीकरण बांधकामाचा आराखडा मंजुरीसाठी नागरी विमान उड्डाण विभागाकडे सादर करण्यात आला होता. या आराखड्यात नवीन ॲप्रॉनचे बांधकाम, विद्यमान ॲप्रॉनचा विस्तार आणि संबंधित नवीन टॅक्सी वेसाठी संकल्पना/आराखडा आदींचा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

या कामाला आता एरोड्रम सल्लागार समितीने मान्यता दिली आहे. विस्तारीकरणाचे काम करताना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रमाणित कार्य पद्धतीचा अवलंब करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच विमानांच्या संचालनाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली माहिती विमानतळ हवाई वाहतूक सेवेला दररोज कळवावी. जेणेकरून विमानतळावरील कामांची सूचना संबंधितांना दिली जाईल, असेही या पत्रात म्हटले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

ओझर विमानतळ विस्तारीकरणाच्या आराखड्यास मंजुरी मिळाल्यामुळे या कामाला गती येणार आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याबरोबरच जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण होण्यास मदत होणार आहे. त्याबरोबरच शासनातर्फे विस्तारीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी विमानतळ विस्तारीकरणाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790