नाशिक: शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्याला अटक; विधिसंघर्षित बालकाचाही समावेश

नाशिक। दि. २० मे २०२६: देवळाली कॅम्प परिसरात कुटुंबीयांसह बसची प्रतीक्षा करत असलेल्या नागरिकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-२ने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सराईत गुन्हेगारासह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

अरमान मेहरबानअली सैय्यद (वय २३, रा. बागुलनगर, विहितगाव, नाशिक रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यासोबतच गुन्ह्यातील संशयित विधिसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अरमान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात खून आणि गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

ही घटना १६ मे रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास संसारी नाका परिसरात घडली होती. फिर्यादी हे आपल्या कुटुंबीयांसह बसची वाट पाहत उभे असताना आरोपी आणि त्याच्या साथीदाराने त्यांना गाठले. धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्यांनी फिर्यादी यांच्या पत्नी व बहिणीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी विरोध केल्यानंतर आरोपींनी त्यांना मारहाण करत खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाला संशयितांबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार आयटीआय सिग्नल, सातपूर आणि वडनेर गेट परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी इतर साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ कडील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी), डॉ. समाधान हिरे, श्रेणी. पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, शंकर काळे, हवालदार सुनिल आहेर, अंमलदार प्रविण वानखेडे यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790