नाशिक: पंचवटीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपीला ‘मरेपर्यंत फाशी’ची शिक्षा !

नाशिक। दि.. १५ मे २०२६: पंचवटी परिसरातील कालिकानगर येथे २०१८ मध्ये घडलेल्या तिहेरी हत्याकांड आणि जाळपोळ प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला “मरेपर्यंत फाशी”ची शिक्षा सुनावली आहे. तब्बल आठ वर्षे चाललेल्या या खटल्याचा निकाल लागल्याने प्रकरणाची अखेर न्यायालयीन सांगता झाली. सहजीवनास नकार दिल्याच्या संतापातून आरोपीने महिला, तिची मुलगी आणि अवघ्या नऊ महिन्यांच्या नातीला जिवंत जाळल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

या प्रकरणातील आरोपी जलालउद्दीन अलीमोहम्मद मलिक उर्फ खान साहेब (रा. फुलेनगर) याने ६ ऑगस्ट २०१८ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास दिंडोरी रोडवरील कालिकानगर येथील घरात घुसून संगीता सुरेश देवरे (वय ३८), त्यांची मुलगी प्रीती रामेश्वर शेंडगे (वय २०) आणि नात कु. सिद्धी रामेश्वर शेंडगे (वय ९ महिने) यांच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले होते. गंभीर भाजल्याने तिघींचाही मृत्यू झाला होता.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगीता देवरे यांनी आरोपीसोबत राहण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आरोपीने पेट्रोल पंपावरून डिझेल आणून घरात झोपलेल्या तिघींवर ओतून त्यांना पेटवून दिल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

या प्रकरणात पोलिसांनी भक्कम परिस्थितीजन्य पुरावे गोळा करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. भंसाळी यांनी फिर्यादी, साक्षीदार, पंचांचे जबाब तसेच पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांचा आधार घेत आरोपीला दोषी ठरवले. भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता लीना चव्हाण तसेच तत्कालीन सरकारी अभियोक्ता अमित बनसोडे यांनी काम पाहिले. निकालानंतर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तपासी अधिकारी आणि अभियोग पथकाचे अभिनंदन केले. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक के. डी. वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. डी. शार्दुल आणि पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी केला होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790