जनगणना-2027: स्व- गणनेचा आज (दि. १५) शेवटचा दिवस

जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी स्व- गणनेत सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक। दि. १५मे २०२६: केंद्र सरकारच्या माध्यमातून जनगणना सुरू आहे. त्यानुसार १ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व- गणनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवार १५ मे हा स्व- गणनेचा शेवटचा दिवस असून जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे. तसेच आगामी काळात जनगणनेसाठी घरोघरी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकला मुसळधार पावसाचा तडाखा; गोदावरीला हंगामातील पहिला मोठा पूर, जनजीवन विस्कळीत

केंद्र सरकारकडून ‘जनगणना-2027’ सुरू आहे. जनगणना ही देशातील सर्वात मोठी प्रशासकीय आणि सांख्यिकीय प्रक्रिया असून, या आकडेवारीच्या आधारेच केंद्र व राज्य सरकारांना विविध विकास योजना तयार करणे आणि पायाभूत सुविधांचे नियोजन करणे शक्य होणार आहे.

या प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे घरगणना (House Listing). नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी शासनाने ‘स्व-गणनेची (Self-Enumeration) सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर धरण ९७ टक्के भरले; शहरातील शनिवारची पाणीकपात रद्द

स्व- गणनेचा कालावधी 1 ते 15 मे 2026 असून स्व- गणना करण्यासाठी उद्या 15 मे 2026 हा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी https://se.census.gov.in या लिंकवर जाऊन स्वतःच्या कुटुंबाची माहिती भरावी. दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत ३८ हजार ७७ नागरिकांनी स्व- गणना केली आहे.

जे नागरिक काही कारणास्तव स्व- गणना करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी शनिवार 16 मे 2026 पासून प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी जाऊन घर गणना करणार आहेत. त्यासाठी नाशिक जिल्ह्यात 33 चार्ज अधिकारी असून त्यांच्या अधिनस्थ एकूण 7 हजार 555 प्रगणकांची व 1 हजार 288 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

जनगणना हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असल्याने प्रत्येक नागरिकाने 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान प्रत्यक्ष घर गणनेसाठी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना आवश्यक ती अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय महत्वाच्या उपक्रमास सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790