नाशिक: अशोक खरातविरोधातील तपास वेगात; १०५ पेक्षा अधिक साक्षीदारांचे जबाब नोंद

नाशिक। दि. १४ मे २०२६: भोंदूगिरी, अंधश्रद्धा पसरवून महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरातविरोधातील गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) वेगाने सुरू असून आतापर्यंत १०५ हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणात महिलांशी संबंधित लैंगिक अत्याचाराच्या आठ गुन्ह्यांसह एक फसवणुकीचा गुन्हा SIT कडून तपासला जात असल्याची माहिती बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकातून समोर आली.

महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार २० मार्च २०२६ रोजी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकात दोन पोलिस उपअधीक्षक, तीन पोलिस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलिस निरीक्षक, दहा पोलिस उपनिरीक्षक आणि सहा कर्मचारी अशा एकूण २४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

अशोक खरातविरोधात नाशिक आणि नगर जिल्ह्यात एकूण १७ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी नऊ गुन्ह्यांचा तपास SIT कडून केला जात आहे. तर काही गुन्ह्यांचा तपास नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर पोलिसांकडून स्वतंत्रपणे सुरू आहे.

अशोक खरात विरूद्ध दाखल असलेल्या एकूण गुन्हयांपैकी ८ गुन्हे हे महिलांचे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत. तसेच उर्वरित ९ गुन्हे हे फसवणूक सह अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम २०१४ व इतर या प्रमाणे दाखल आहेत.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक खरात हा पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा आभास निर्माण करून पूजा, विधी, खडे, रुद्राक्ष आदींच्या माध्यमातून पैसे उकळले जात होते. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची भीती दाखवून महिलांना धमकावत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे SIT ने म्हटले आहे.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

तपास यंत्रणेला या प्रकरणात मौखिक, भौतिक, दस्तऐवजीकरण स्वरूपातील तसेच इलेक्ट्रॉनिक पुरावे मिळाले असून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये कायद्यानुसार ६० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक असल्याने तपासाला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून उर्वरित प्रकरणांमध्येही पुढील काही दिवसांत दोषारोपपत्र सादर करण्यात येणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

दरम्यान, पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी SIT ने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाच्या मदतीने तब्बल १३ हजार १७५ लिंक हटविण्यात आल्या असून वारंवार आक्षेपार्ह पोस्ट करणारी ४५१ सोशल मीडिया खाती कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहेत. या प्रकारात आतापर्यंत दोन स्वतंत्र गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

सध्या आरोपी अशोक खरात हा विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असून तपास अद्याप सुरूच आहे. पुढील काळात आणखी पुरावे समोर आल्यास पूरक दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे SIT ने स्पष्ट केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790