नाशिक: महा साधना सप्ताहात नाशिक विभागीय आयुक्तालयाला प्रथम पुरस्कार

नाशिक। दि. ९ मे २०२६: शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृध्दीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचा क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत राज्यभरात महा-साधना सप्ताह आयोजित करण्यात आला होता.

या ऑनलाईन स्वरुपातील कार्यक्रमात नाशिक विभागाने सर्वोत्तम कामगिरी केली असून राज्याचे माहिती व तंत्रज्ञानमंत्री ॲड. आशिष शेलार आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. मंत्रालयात आयोजित ‘TECH-वारी 2.0’ या कार्यक्रमात नाशिक विभागाचे अपर आयुक्त सुदाम परदेशी यांनी हा सन्मान स्वीकारला.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

नाशिक विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवून प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल आणि राज्यात अव्वल ठरल्याबद्दल विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

जिल्हा परिषद स्तरावर सर्वाधिक नोंदणी व सहभाग नोंदविलेल्या अधिकारी व कर्मचारी गटात नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून हा पुरस्कार नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावतीने प्रतिभा संगमनेरे यांनी स्वीकारला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

केंद्र शासनाने साधना सप्ताह राबविण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने राज्यभरात २ ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत महा-साधना सप्ताह आयोजित करण्यात आला. या सप्ताहात विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ७ दिवसांत किमान ४ तासांचे अभ्यासक्रम आयगॉट कर्मयोगी भारत पोर्टलवर पूर्ण करावे लागणार होते. यामध्ये नाशिक विभागाने सरस कामगिरी केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पूर्णपणे ऑनलाईन स्वरुपातील हा कार्यक्रम होता. यामध्ये शासनाच्या विविध विभागांतील काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाशी संबंधित नवीन कौशल्ये, तंत्रज्ञान आणि कार्यालयीन कामकाज सुकर होण्याच्या पद्धती शिकता आल्या. नाशिक विभागातील कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी हा सन्मान सर्व अधिकारी-कर्मचारी वर्गास प्रोत्साहन देणारा असल्याचे डॉ. गेडाम यांनी नमूद केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790