राज्य नाट्य स्पर्धेंसाठी संस्थांनी 25 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन

नाशिक। दि. २ सप्टेंबर २०२६: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धा तसेच बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांनी 25 सप्टेंबर, 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह प्रवेशिका 25 सप्टेंबर 2026 पर्यंत https://mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक परिमंडळातील ७४ हजार ५५७ ग्राहक वीज निर्माते; छतावर बसविली २६० मेगावॅट क्षमतेची सौर यंत्रणा

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. 23 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबर 2026 पासून राज्यातील विविध 10 केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 65 व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येकी एका केंद्रावर डिसेंबर 2026 पासून घेण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सीएनजी दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ.. जाणून घ्या नवे दर

स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर आणि दिलेल्या तारखेस नाट्यप्रयोग सादर न केल्यास प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्य स्पर्धेसाठी शासनाने निश्चित केलेले नियम संस्थांना बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित संस्थेला स्पर्धेसाठी अपात्र ठरविण्यात येईल.

तसेच नोंदणीकृत हौशी नाट्य संस्था तसेच गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना विहित नमुन्यातील प्रवेशिका व स्पर्धेचे नियम महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध आहेत. विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा प्रवेशिकेतील संपूर्ण तपशील भरलेला नसल्यास ऑनलाइन प्रवेशिका सादर करता येणार नाही. राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा, असेही आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. खेडेकर यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790