नाशिक (प्रतिनिधी): पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली करण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या विविध कर विभागाकडून एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ३०५ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत.
पंधरा दिवसाच्या आत थकबाकी अदा न केल्यास पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.
घरपट्टी पाठोपाठ महापालिकेच्या विविध विभागाने पाणीपट्टी वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. घरपट्टीच्या माध्यमातून पहिल्या तिमाहीत सवलत दिल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. महापालिकेच्या तिजोरीत पहिल्या तीन महिन्यातच जवळपास ९१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
त्यानंतर आता टप्प्याटप्प्याने घरपट्टीची वसुली केली जात आहे. घरपट्टीची वसुली करताना पाणीपट्टी वसुलीदेखील महत्त्वाची आहे. ‘ना- नफा व ना- तोटा’ तत्त्वावर चालणाऱ्या पाणीपुरवठा योजनांवरचा किमान खर्च भागवण्यासाठी वसुलीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शहरांमध्ये दोन लाख सहा हजार नळजोडणीधारक आहे.
नियमित देयके वाटपाची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने थकबाकी वाढत आहे. एक लाख २१ हजार ६४६ नळजोडणीधारकांना आतापर्यंत पाणीपट्टीची देयके वितरित करण्यात आली. ८४ हजार ९८१ देयकांच्या वाटपासाठी सप्टेंबरअखेर मुदत आहे. देयके वाटप करून पाणीपट्टी वसुलीचा तगादा लावताना दुसरीकडे थकबाकीदारदेखील रडारवर आहे.
एक लाख रुपयांपेक्षा अधिक पाणीपट्टी थकीत असलेले ३०५ नळजोडणी धारकांची यादी तयार करण्यात आली. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत ३०५ नळजोडणीधारकांकडून १३ कोटी रुपयांची थकीत पाणीपट्टी वसूल केली जाणार आहे.
पंधरा दिवसाच्या आत थकबाकीची रक्कम अदा न केल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याबरोबरच गुन्हादेखील दाखल केला जाणार असल्याची माहिती विविध विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार यांनी दिली.