Amazon

जिल्ह्यातील २६ धरणांत २९,३८५ दलघफू पाणीसाठा; दहा दिवसांत ३.४२ टक्क्यांची घट

नाशिक। दि. २८ एप्रिल २०२६: जिल्ह्यातील मोठे व मध्यम मिळून एकूण २६ धरणांमध्ये सध्या सुमारे २९,३८५ दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा सुमारे दहा टक्क्यांनी अधिक असला, तरी मागील दहा दिवसांत पाणीसाठ्यात ३.४२ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. गतवर्षी २७ एप्रिल रोजी हा साठा २२,२२२ दलघफू इतका होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंक बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २८४ प्रवाशांवर कारवाई; १४ हजारांचा दंड वसूल

दरम्यान, जिल्ह्यातील काही तालुक्यांतील गावे, वाड्या-वस्त्या आणि आदिवासी पाड्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी धरणांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या या भागांत जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

कोळवण नदीवरील वाघाड या मध्यम प्रकल्पात सर्वात कमी म्हणजे केवळ ९.९५ टक्के (२२९ दलघफू) पाणी शिल्लक आहे. तर पुणेगाव धरणातील पाणीसाठाही ९.७९ टक्क्यांवर घसरला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण साठा सध्या ४१.६१ टक्के इतका आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: श्री साक्षी गणेश मंदिरात आज सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

उन्हाची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवनाचा वेगही वाढला असून जलसाठ्यांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तसेच नागरिकांमध्ये पाणीबचतीबाबत जनजागृती वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत, जेणेकरून पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होऊ नये. सध्या काही तालुक्यांतील गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी ६१ टँकरच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  सुरगाण्यात ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप; नाशिक शहरापासून ५३ किलोमीटरवर केंद्रबिंदू

प्रमुख धरण साठा (टक्क्यांत)
गंगापुर: ५२.२९
कश्यपी: ४८.५४
गौतमी: ७९.१८
पालखेड: ३५.२२
करंजवण: ३३.३६
ओझरखेड: ३९.६७
तीसगाव: १६.७०
दारणा: ४२.५०
भावली: ३३.१९
मुकणे: ४५.१०
वालदेवी: ६८.८४

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790