नाशिक (प्रतिनिधी): मुंबई नाका सर्कल परिसरात दररोज संध्याकाळी पाच ते रात्री आठपर्यंत होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने आयआयटी पवईला पत्र पाठविले आहे.
त्यात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्याय सुचविण्याची विनंती केली आहे. शहरात मुंबई नाका, एबीबी सर्कल, सिटी सेंटर मॉल सर्कल, सीबीएस अशोकस्तंभ, फेम सिनेमा सिग्नल, द्वारका भागामध्ये सातत्याने वाहतूक ठप्प होते.
मुंबई नाका सर्कल येथे दररोज संध्याकाळी पाच ते रात्री आठदरम्यान वाहतूक ठप्प होत असल्याने त्याचा परिणाम शहरातील अन्य वाहतुकीवर होत आहे.
त्यामुळे वाहतूक सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये मुंबई नाका येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपाय सुचविले.
त्यात अंडरपास करणे, सिग्नल यंत्रणा बसविणे या पर्यायांचा अवलंब करण्याच्या अनुषंगाने आयआयटी पवईकडे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आयआयटी पवईकडे मुंबई नाका सर्कल येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपाय सुचवावे, अशी विनंती पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.