नाशिक। दि. २७ एप्रिल २०२६: आडगाव परिसरातील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारी दुपारी सुमारे १२ वाजता लिफ्टशी संबंधित गंभीर अपघात घडला. या दुर्घटनेत ज्योती आहिरे (वय ५०, रा. मानेनगर, अमृतधाम) ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, आहिरे या महाविद्यालयाच्या पहिल्या मजल्यावर काम करत होत्या. ऑपरेशन थिएटरसाठी लागणारे साहित्य वाहून नेण्यासाठी वापरली जाणारी संबंधित लिफ्टचे दार उघडे दिसल्याने त्यांनी आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी वरून लिफ्ट खाली आल्याने त्यांना जोरदार धक्का बसला.
या अपघातात त्यांच्या डोके व मानेचा भाग लिफ्टमध्ये अडकला, परिणामी मणक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा रक्तदाबही अचानक खालावल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मुलाने रुग्णालयात धाव घेतली. घटनास्थळी निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत वेदनादायक होती. दरम्यान, या घटनेनंतर वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने अपघाताची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
![]()

