निफाडला निसर्गाचा खेळच न्यारा… सर्वात थंड तालुक्यात तापमानाचा पारा गेला चाळीशी पार

निफाड। दि. १८ एप्रिल २०२६ (दीपक श्रीवास्तव): राज्यातील सर्वाधिक थंडीचा विक्रम करणारा निफाड परिसर सध्या उष्णतेच्या लाटेने अक्षरशः होरपळून निघत आहे. वर्षाच्या प्रारंभी विक्रमी थंडी पडलेल्या निफाडला गेल्या आठवडाभरात सातत्याने 40°c पेक्षा जास्त तापमानाची नोंद होत असल्याने निफाडकरांसाठी निसर्गाचा खेळच न्यारा असे म्हणायची वेळ आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

चैत्र महिन्यात ही वेळ तर वैशाख वणवा कसा असणार हा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या मोसमात निफाडला पाऊस देखील सरासरीपेक्षा दोन ते अडीच पटीने जास्त झाल्याचे दिसून आले आहे. निफाड येथील कृषी संशोधन केंद्र कडून उपलब्ध आकडेवारीनुसार शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी पहाटे संपलेल्या 24 तासांमध्ये निफाड चा पारा 40.9 अंश सेल्सिअस वर पोहोचलेला दिसून आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

या वर्षातील हे सर्वाधिक तापमान असून संपूर्ण आठवडाभरात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. पुढील काही दिवस ढगाळ हवामान आणि पर्जन्य वृष्टीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविला जात असल्याने उन्हाच्या तडाख्यापासून थोडाफार दिलासा मिळाल्याची आशा निर्माण झाली आहे.

निफाड येथे गेल्या दहा दिवसातील कमाल तापमानात झालेली वाढ पुढील प्रमाणे आहे.
दि. 9 – 34.8° सेल्सियस
दि. 10 – 34.4° सेल्सियस
दि. 11 – 36.8° सेल्सियस
दि. 12 – 39.2° सेल्सियस
दि. 13 – 40.2° सेल्सियस
दि. 14 – 40.6° सेल्सियस
दि. 15 – 40.5° सेल्सियस
दि. 16 – 40.7° सेल्सियस
दि. 17 – 39.4° सेल्सियस
दि. 18 – 40.9° सेल्सियस

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790