कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक–त्र्यंबकेश्वरमध्ये १६ वारसा संवर्धन प्रकल्पांना वेग

नाशिक। दि. १९ एप्रिल २०२६: जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील धार्मिक व ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संवर्धनाला गती मिळाली असून, सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ही कामे हाती घेण्यात आली आहेत. कुंभमेळा प्राधिकरणाच्या समन्वयाने राज्य पुरातत्त्व विभागाकडून राबविण्यात येत असलेली ही मोहीम ‘ समृद्ध वारसा’ जतन करण्यावर केंद्रित आहे. मंदिर, कुंडे आणि तीर्थस्थळे ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असल्याने त्यांच्या मूळ स्थापत्य वैशिष्ट्यांचे जतन करत संवर्धनावर भर देण्यात येत आहे.

या अंतर्गत एकूण १६ वारसा संवर्धन प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यासाठी सुमारे ५५.७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक (६) आणि त्र्यंबकेश्वर (१०) अशा दोन प्रमुख ठिकाणी ही कामे सुरू असून, सर्व प्रकल्पांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

या कामांमध्ये प्राचीन दगडी मंदिरांचे जतन, समाधी स्थळांची दुरुस्ती, तसेच कुंभमेळ्यातील धार्मिक विधींमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या पवित्र कुंडे व तीर्थांची मजबुतीकरण व सुशोभीकरण यांचा समावेश आहे. वाढत्या भाविक संख्येचा विचार करून वारसा स्थळांच्या परिसराचे नियोजन, सुरक्षितता आणि सुकर प्रवेश यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

नाशिक शहरात नारोशंकर मंदिर, सुंदर नारायण मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर व इतर मंदिर संकुले तसेच ऐतिहासिक भिंतींचे जतन आणि परिसर विकासाची कामे सुरू आहेत. या माध्यमातून शतकानुशतके टिकून असलेल्या वास्तूंची स्थिरता वाढविण्यासोबतच भाविकांसाठी अधिक सुटसुटीत आणि सुरक्षित व्यवस्था निर्माण केली जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त कुंड, बिल्व तीर्थ, प्रयाग तीर्थ, इंद्र कुंड आणि गौतमेश्वर मंदिर व तलाव यांसारख्या महत्त्वाच्या स्थळांवर कामे प्रगतीपथावर आहेत. कुंभमेळ्यातील स्नान आणि धार्मिक विधींचे केंद्र असलेल्या या स्थळांच्या दृष्टीने संरचनात्मक मजबुतीकरण आणि परिसर व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

बहुतांश कामे डिसेंबर २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन असून, कुंभमेळ्यापूर्वी वारसा स्थळे सक्षम आणि सज्ज करण्याचा उद्देश आहे.

१६ वारसा संवर्धन प्रकल्प एक नजर

एकूण प्रकल्प : १६
एकूण निधी : रु. ५५.७२ कोटी
नाशिक : ६ | त्र्यंबकेश्वर : १०
पूर्णता कालावधी : डिसेंबर २०२६ – मार्च २०२७

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

नाशिकमधील स्थळे:
नारोशंकर मंदिर
अजगरेश्वर बाबा समाधी
एकमुखी दत्त मंदिर ते बाळाजी कोट भिंत परिसर
मोडकश्वर व टाळकुटेश्वर मंदिर परिसर
काशी विश्वेश्वर, सांडव्याची देवी व प्राचीन श्रीराम मंदिर
सुंदर नारायण मंदिर (संरक्षक भिंत)

त्र्यंबकेश्वरमधील स्थळे :
गौतमेश्वर मंदिर व तलाव
संगम तीर्थ व जुने कुशावर्त कुंड
इंद्र कुंड
बिल्व तीर्थ
मुकुंदेश्वर मंदिर व तलाव
प्रयाग तीर्थ
चोखोबा महाराज मंदिर
कुशावर्त कुंड (भाग २ व ३)

मुख्य लक्ष :
पारंपरिक पद्धतीने मंदिर संवर्धन
कुंड व तीर्थांचे पुनरुज्जीवन
जुन्या वास्तूंचे संरचनात्मक मजबुतीकरण
भाविकांसाठी सुरक्षित व सुसूत्र परिसर विकास

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790