उत्तर महाराष्ट्रात चार दिवस ढगाळ हवामान, तुरळक पावसाची शक्यता

नाशिक। दि. २ फेब्रुवारी २०२६: नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आजपासून पुढील चार दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या कालावधीत काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून गुरुवारनंतर (दि. ५) ढगाळपणा कमी होऊन वातावरण हळूहळू निवळण्याची शक्यता आहे. दरम्यान, थंडीचा प्रभाव कमी होऊन नागरिकांना उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रविवारी (दि. १) सकाळी नाशिकमध्ये किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, सटाणा, कळवण, देवळा आणि मालेगाव या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी अत्यल्प प्रमाणात पावसाची शक्यता असून २ ते ४ मिमीपर्यंत हलक्या सरी पडू शकतात. गुरुवारपासून हवामान पूर्ववत होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज आहे.

पंजाब व राजस्थानच्या अक्षवृत्तांवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे थंड व कोरडे वारे खान्देशमार्गे उत्तर महाराष्ट्रात पोहोचले आहेत. त्याच वेळी राज्यावर प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरातून येणारी आर्द्रता या थंड वाऱ्यांमध्ये मिसळत आहे. परिणामी नाशिकसह खान्देशातील काही जिल्ह्यांवर पुन्हा एकदा ढगाळ हवामानाचे सावट पसरले आहे.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

शनिवारपर्यंत (दि. ७) पहाटेच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीऐवजी रात्री उकाडा जाणवू शकतो. एकूणच किमान तापमानात वाढ झाल्याचे चित्र राहणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात संमिश्र हवामानामुळे अधूनमधून माफक थंडी अनुभवास येऊ शकते. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील सुमारे १९ जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रभाव कमी राहणार असून नाशिकमध्ये कमाल तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता सध्या तरी दिसून येत नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790