राज्यात उष्णतेचा कडाका आणि वादळी पावसाचा इशारा

नाशिक। दि. २० एप्रिल २०२६ : महाराष्ट्रातील हवामानाने सध्या तीव्र आणि अनिश्चित स्वरूप धारण केले असून राज्याला उष्णतेच्या लाटेसोबतच वादळी पावसाचे दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. रविवारी विदर्भातील अकोला आणि वर्धा येथे तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा पार करत देशातील सर्वाधिक उष्णतेची नोंद झाली.

दरम्यान, हवामान खात्याने २० ते २२ एप्रिलदरम्यान राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने परिस्थितीची दखल घेत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

नाशिक शहरात रविवारी मध्यरात्री विल्होळी परिसरासह काही उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागली. जिल्ह्यातील मालेगाव येथेही दुपारी सुमारे २० मिनिटे पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहून कमाल तापमान ३९.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. याशिवाय सोलापूर, परभणी, जालना आदी भागांतही पावसाने हजेरी लावली. आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

पुढील काही दिवसांचा अंदाज :

  • २० एप्रिल : नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगाव येथे मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता.
  • २० ते २१ एप्रिल : मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीडसह अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किमी वेगाच्या वाऱ्यासह पाऊस; गारपिटीचीही शक्यता.
  • २२ एप्रिल : विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता असून त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज.
🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

‘अँटी सायक्लोनिक’ स्थितीचा परिणाम :
राज्यातील वातावरणावर सध्या ‘अँटी सायक्लोनिक’ प्रणालीचा प्रभाव दिसून येत आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३ ते ३.५ किलोमीटर उंचीवर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा परिसरात ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण व गोवा भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790