Amazon

नाशिकमध्ये ऑक्टोबर हिटचा कहर; कमाल तापमानाचा पारा ३५.४ अंशांवर

नाशिक । दि. ८ ऑक्टोबर २०२६: ऑक्टोबर महिन्यातील उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, नाशिककर अक्षरशः उकाड्याने हैराण झाले आहेत. हवेतील आर्द्रता कमी झाल्याने कोरडे वातावरण निर्माण झाले असून, बुधवारी (दि. ७) शहरात गेल्या सात दिवसांतील सर्वाधिक ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दुपारच्या वेळी वाढणाऱ्या प्रखर उन्हामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरही वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

सणासुदीचा काळ असल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. मात्र, सकाळी ११ वाजल्यानंतर उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दुपारी ४ वाजेपर्यंत नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे मेनरोड, शालिमार, शरणपूररोड, कॉलेजरोड आणि गंगापूररोड यांसारख्या नेहमी गजबजलेल्या मार्गांवर दुपारच्या वेळेत तुलनेने शुकशुकाट जाणवत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वन्यजीव सप्ताहानिमित्त नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात निसर्ग निर्वाचन केंद्र व तिकीट घराचे उद्घाटन

उन्हाचा चटका वाढल्याने नागरिकांचा कलही थंड पदार्थांकडे वाढला आहे. ज्यूस सेंटर, आईस्क्रीम पार्लर तसेच उसाच्या रसाच्या गाड्यांवर दुपारच्या वेळी गर्दी होताना दिसत आहे. दुसरीकडे, नेहमी भाविक आणि पर्यटकांनी गजबजणाऱ्या गोदाघाट परिसरातही दुपारच्या कडक उन्हामुळे वर्दळ लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

दुहेरी हवामानाचा आरोग्यावर परिणाम:
दिवसा कडक ऊन, तर सकाळी आणि संध्याकाळी जाणवणारा गारवा, अशा बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सर्दी, खोकला, घसा खवखवणे आणि डोकेदुखीच्या तक्रारी वाढत असून, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास जाणवत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी संपर्क करण्याचे आवाहन

विजेच्या मागणीतही वाढ:
तापमानात झालेल्या वाढीमुळे घरांमध्ये पंखे, कूलर आणि वातानुकूलित यंत्रांचा वापर वाढला आहे. परिणामी, शहरातील विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे.

आणखी काही दिवस उष्णतेचा तडाखा:
हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने वातावरण कोरडे झाले आहे. त्यामुळे सूर्यकिरण अधिक तीव्रतेने जमिनीवर पोहोचत असून, तापमानात वाढ होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी किमान ८ ते १० दिवस नाशिकमध्ये तापमान चढेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या तीव्र उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790