Amazon

अंबड दुषित पाणी प्रकरण: प्रदुषण नियंत्रणाचे नियम न पाळणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

नाशिक। दि. ८ ऑक्टोबर २०२६: अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या दत्तनगर, मारुती संकुल, तुळजाभवानी परिसर तसेच आसपासच्या भागातील दूषित पाण्याच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नागरिकांच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या. तसेच दूषित पाण्यामुळे त्वचेच्या तक्रारी व अन्य त्रास जाणवत असलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि भावना जाणून घेतल्या.

दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी ऐकून मंत्री गिरीश महाजन यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. नागरिकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही आणि निष्काळजीपणा करणाऱ्या कोणत्याही उद्योगाला पाठीशी घातले जाणार नाही, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ‘अमृत’मार्फत निःशुल्क ॲग्रीकल्चर ड्रोन प्रशिक्षण

नागरिकांना सुरक्षित आणि मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नाशिक महानगरपालिकेने तातडीने आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे. दूषित पाण्याचा वापर नागरिकांकडून होऊ नये आणि त्यातून आरोग्यावर आणखी गंभीर परिणाम होऊ नयेत, यासाठी प्रभावित भागातील हातपंप आणि कुपनलिका तातडीने बंद करावे.

दरम्यान, या प्रश्नाची तातडीने दखल घेत पालकमंत्री महाजन यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. संबंधित विभागांनी तातडीने आवश्यक ती कारवाई करावी, दोषी घटकांची चौकशी करून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर कठोर पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यासोबतच उद्योग, पर्यावरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रधान सचिव तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही मंत्री महाजन यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला. अंबड परिसरातील जलप्रदूषणाची वस्तुस्थिती तातडीने तपासून दोषी उद्योगांवर कठोर कारवाई करावी, असे सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये साकारणार फुटबॉलचे अत्याधुनिक मैदान; हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर लावणार फ्लडलाईस्

औद्योगिक प्रक्रियेतून निर्माण होणारे सांडपाणी योग्य प्रक्रिया न करता थेट नाल्यात किंवा जमिनीत सोडणाऱ्या कंपन्यांविरोधातही मंत्री महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. ज्या कंपन्यांमुळे जलप्रदूषण होत आहे किंवा ज्या कंपन्यांनी प्रक्रिया न करता दूषित पाणी सोडले आहे, अशा कंपन्यांवर कारवाईची सूचना त्यांनी प्रशासनाला दिली.

CETP प्रकल्पाचीही पाहणी:
अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (CETP) प्रकल्पालाही मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन पाहणी केली. प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये ऑक्टोबर हिटचा कहर; कमाल तापमानाचा पारा ३५.४ अंशांवर

“नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नाही”:
अंबडमधील परिस्थिती केवळ दूषित पाण्याची समस्या नसून नागरिकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाच्या सुरक्षेशी निगडित असल्याचे ते म्हणाले. नागरिकांना सुरक्षित पाणी मिळणे, दूषित पाण्याचा वापर तातडीने थांबविणे, जलप्रदूषणाचा स्रोत शोधणे, दोषी उद्योगांवर कारवाई करणे आणि CETP प्रकल्प वेळेत कार्यान्वित करणे या सर्व बाबींवर प्रशासनाने एकत्रितपणे काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह उद्योग विभाग, पर्यावरण विभाग, प्रदुषण नियंत्रण विभाग, महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790