नाशिक: गोदावरीकाठी १२ नवीन घाट उभारणी; नाशिक-त्र्यंबकेश्वरात स्नानक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार

नाशिक। दि. ३० मार्च २०२६: सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीकाठावर १२ नवीन घाट उभारण्यात येत असून, भाविकांसाठी उपलब्ध होणारी स्नान व धार्मिक विधींची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नाशिक महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ आणि जलसंपदा विभाग यांच्या माध्यमातून ही कामे सुरू असून, कुंभमेळ्यापूर्वी ती पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

नाशिक शहरातील घाटांची संख्या सध्या असलेल्या १० घाटांवरून २० पर्यंत वाढविण्यात येणार असून, सुमारे ९ किलोमीटर लांबीच्या गोदावरी किनाऱ्यावर ही विस्तारयोजना राबवली जात आहे. कपिला संगम घाट, नंदिनी संगम घाट, टाकळी संगम ब्रिज घाट, टाकळी संगम घाट, नांदूर दसक डावा काठ, नांदूर दसक उजवा काठ, ओढा घाट, सोमेश्वर धबधबा घाट, नवश्या गणपती घाट आणि लक्ष्मीनारायण घाट या १० नवीन घाटांमुळे एकूण ३,४५१ मीटर नवीन घाट लांबीची भर पडणार असून, यासाठी अंदाजे ३६१.२६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या डाव्या व उजव्या काठावर प्रत्येकी एक असे दोन नवीन घाट उभारले जात असून, एकूण ३,१४० मीटर लांबीची वाढ होणार आहे. जलसंपदा विभागामार्फत सुमारे १४६.१० कोटी रुपये खर्चातून ही कामे हाती घेण्यात आली असून, मार्च २०२७ पर्यंत ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर घाटांची रचना करताना गर्दी व्यवस्थापनाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक घाटासाठी निश्चित क्षमता, पोलिस चौक्या, वॉचटॉवर्स, स्वतंत्र प्रवेश-निर्गम मार्ग, आपत्कालीन सेवा मार्ग आणि पार्किंगशी जोडणी यांचा समावेश करण्यात येत आहे. याशिवाय वस्रांतरगृहे , स्वच्छतागृहे आणि प्रकाशव्यवस्था ही मूलभूत सुविधा म्हणून उपलब्ध करून दिली जाणार आहे. सर्व घाटांसाठी एकसंध नामांकन आणि सीमांकन प्रणाली विकसित केली जात असून, कुंभमेळ्यादरम्यान विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधणे अधिक सुलभ होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

अमृत स्नानाच्या दिवशी एकाच वेळी लाखो भाविक स्नानासाठी एकत्र येतात. अशा वेळी सुस्थित आणि स्पष्टपणे व्यवस्थापित घाटक्षेत्र ही सुरक्षिततेची मूलभूत गरज ठरते.

“घाट हेच सिंहस्थाचे केंद्रबिंदू आहेत. रस्ते, पार्किंग, आरोग्य सुविधा यांसारखी इतर सर्व पायाभूत व्यवस्था भाविकांना सुरक्षितपणे घाटापर्यंत आणण्यासाठी आणि परत नेण्यासाठी आहे. त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही काठांवर घाटांची क्षमता वाढवून आणि त्यांचे आधुनिकीकरण करून सिंहस्थ २०२७च्या प्रमाणाला साजेशी व्यवस्था उभारण्यात येत आहे,” असे नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

नाशिक : १० नवीन घाट | वाढीव लांबी – ३,४५१ मीटर | खर्च – ३६१.२६ कोटी रुपये
त्र्यंबकेश्वर : २ नवीन घाट | वाढीव लांबी – ३,१४० मीटर | खर्च – १४६.१० कोटी रुपये
एकूण नवीन घाट लांबी : ६,५९१ मीटर

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

प्रस्तावित घाट – नाशिक:
कपिला संगम घाट — ४०० मीटर
नंदिनी संगम घाट — २७५ मीटर
टाकळी संगम ब्रिज घाट — ४०० मीटर
टाकळी संगम घाट — ३०० मीटर
नांदूर दसक डावा काठ — ५०० मीटर
नांदूर दसक उजवा काठ — ५७० मीटर
ओढा घाट — २५५ मीटर
सोमेश्वर धबधबा घाट — १७४ मीटर
नवश्या गणपती घाट — १६७ मीटर
लक्ष्मीनारायण घाट — ४१० मीटर
एकूण : ३,४५१ मीटर

प्रस्तावित घाट – त्र्यंबकेश्वर
डावा काठ — १,६१४ मीटर
उजवा काठ — १,५२६ मीटर
एकूण : ३,१४० मीटर

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790