नाशिक। दि. २३ मे २०२६: प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या 12 वाहनांचा 2 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता जाहीर ई-लिलाव करण्यात येणार आहे. या ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी 27 मे 2026 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
जाहीर ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुक नागरिकांनी 22 ते 27 मे 2026 पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे 25 हजार रूपये रकमेचा (प्रत्येक लॉटकरिता) RTO, NASHIK या नावाने अनामत धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) सह नोंदणी करून कागदपत्रांची पूर्तता 29 मे 2026 पर्यंत करणे आवश्यक आहे. लिलाव करण्यात येणाऱ्या 12 वाहनांत ऑटोरिक्षा व मालवाहू वाहने यांचा समावेश आहे.
वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली अडकवून ठेवलेल्या वाहनांच्या मालकांना कर अदा करण्यासाठी त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोच देयक टपालाने नोटीस देण्यात आली आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 व त्याअंतर्गत नियमांतील तरतुदीनुसार वाहन मालकांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिकाऱ्यास कळविणे बंधनकारक असतांना देखील सदर वाहन मालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयस तसे न कळविल्यामुळे हे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.
लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर व पर्यावरण कर भरण्याची संधी वाहन मालकांना राहील. या जाहीर ई-लिलावाच्या अटी व शर्ती 22 मे 2026 पासून www.eauction.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. सदर वाहने जशी आहे तशी या तत्वावर जाहिर ई-लिलवाद्वारे विकली जाणार आहेत. कोणेतही कारण न देता लिलावातील वाहनांची संख्या कमी करण्याचे तसेच सदर जाहिर लिलाव रद्द करण्याचे अधिकारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कर वसुली अधिकारी नाशिक यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत.
![]()

