अन्न व औषध विभागामार्फत विनापरवाना हँण्ड सँनिटायझरचा साठा जप्त

नाशिक(प्रतिनिधी): कोरोना विषाणुचा प्रतिबंध करण्याच्या दृष्टीकोनातून अन्न व औषध प्रशासन, विभागामार्फत पडताळणी मोहिम सुरु आहे. या पड़ताळणी मोहिमेत सोनाली पिंजरकर यांच्या गोदावरी रो बंगलो, कलानगर, अमृतधाम, नाशिक येथील राहत्या घरात मे. गोल्डन ओशन कॉस्मेटिक्स या संस्थेच्या नावे विनापरवाना हॅण्डसँनिटायझर व हॅण्डवॉशचे उत्पादन व वितरण होत असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली.

त्यानुसार औषध निरीक्षकांनी धाड टाकली असता प्रक्रियेसाठी लागणारा उत्पादन परवाना नसल्याने २२ हजार ५५० रुपयांचा उत्पादीत हॅण्ड सॅनिटायझर, हॅण्ड वॉश, कच्चा माल व पक्का मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती सहआयुक्त (औषधे) दुष्यंत भामरे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविली आहे.

श्रीमती पिंजरकर त्यांच्या राहत्या घरात विनापरवाना हॅण्डसॅनिटायझर व हँण्ड वॉशचे उत्पादन करुन विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्याबाबत सखोल चौकशी केली असता ही संस्था ब्ल्यु गोल्ड सॅनिटायझर व क्लिन गोल्ड हॅण्डवॉश 100 ml, Mfg and Marketed By :Golden Green Ocean Cosmetics and Herbal Products Pvt. Ltd, Nashik  या नावाने उत्पादनक करुन त्याचे वितरण/विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे काढलेले नमुने चाचणी व विश्लेषणासाठी औरंगाबाद येथील औषध नियंत्रण प्रयोगशाळा, येथे पाठविण्यात आले. ही कारवाई सहआयुक्त (औषधे) दुष्यंत भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक  ज.द. जाधव व  ज्ञा.मो. दरंदले यांच्या पथकाने केली असल्याची  माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790