
नाशिक। २८ मे २०२६: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद नियोजनाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने २६ मे रोजी नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण सहभागी झाले होते.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य तथा विभागप्रमुख डॉ. कृष्णा एस. वत्सा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य डॉ. दिनेश कुमार असवाल उपस्थित होते. महाराष्ट्र शासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.
बैठकीदरम्यान राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनीता वैद सिंघल आणि कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी सुरू असलेल्या तयारीचा आणि नियोजनाचा आढावा सादर केला.
यावेळी आपत्ती संवेदनशीलता आणि जोखीम मूल्यांकन, आपत्कालीन प्रतिसाद नियोजन, संभाव्य दुर्घटना परिस्थिती, गर्दी व्यवस्थापन, गर्दीच्या उच्च दाबाच्या कालावधीचे विश्लेषण, स्थळ आपत्कालीन नियंत्रण केंद्रांचे कार्यान्वयन, घटना प्रतिसाद प्रणाली तसेच विविध विभागांतील समन्वय यंत्रणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गीय आणि अणुस्तरीय धोक्यांच्या तयारीसंदर्भात उपाययोजना, कुंभमेळा कालावधीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांची नियुक्ती, मोठ्या प्रमाणावरील आपत्कालीन परिस्थितींसाठी विशेष प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करणे यासंदर्भात कुंभमेळा प्राधिकरणाकडून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे तांत्रिक मार्गदर्शन आणि धोरणात्मक सहकार्याची मागणी करण्यात आली. गर्दी व्यवस्थापन आणि यापूर्वीच्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमांतील अनुभवांवर आधारित कार्यशाळा आयोजित करण्याबाबतही चर्चा झाली.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी सुरू असलेल्या आपत्ती व्यवस्थापन तयारीबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने समाधान व्यक्त केले असून आवश्यक ते सर्व धोरणात्मक आणि तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होण्याची अपेक्षा असून सार्वजनिक सुरक्षितता आणि सुरळीत व्यवस्थापनासाठी बहुविभागीय समन्वय आणि सक्षम आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे.
कुंभमेळा प्राधिकरणाकडून सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षित, सुव्यवस्थित आणि समन्वयपूर्ण व्यवस्था उभारण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य शासन आणि सर्व संबंधित विभागांशी समन्वयाने काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
![]()

