सिंहस्थ कुंभमेळा: पार्किंग जागांची महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तातडीने भौतिक पाहणी

नाशिक। दि. १२ फेब्रुवारी २०२६: नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला वेग आला असून नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने शहर व त्र्यंबकेश्वर परिसरातील निश्चित केलेल्या सर्व पार्किंग जागांची तातडीने भौतिक पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिक महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

९ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, नमूद सर्व पार्किंग स्थळांची संयुक्त पाहणी करून त्याचा अहवाल प्राधिकरणाकडे सादर करण्याचे निर्देश महानगरपालिकेला देण्यात आले आहेत. या यादीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील जागांचाही समावेश आहे. तसेच संबंधित पार्किंग भूखंडांचे स्पष्ट हद्दनिर्धारण आणि इतर अपूर्ण माहिती तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

शहरातील पेठ रोड, दिंडोरी रोड, धुळे रोड, पुणे रोड, मुंबई रोड तसेच त्र्यंबकेश्वर रोड परिसरातील विविध मोठ्या भूखंडांचा या यादीत समावेश आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील प्रारंभी प्रस्तावित १५ पार्किंग स्थळे तसेच पोलिस विभागाने सुचविलेल्या अतिरिक्त जागांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

काही जागांबाबत स्पष्ट सीमांकन व डिजिटल नकाशे अद्याप प्रलंबित असल्याने अंतिम वाहतूक आणि पार्किंग आराखडा निश्चित करण्यापूर्वी प्रत्यक्ष पडताळणी आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सिंहस्थ काळात लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक व्यवस्थापनासाठी अचूक माहिती व पूर्वनियोजनाला प्राधान्य देण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “सिंहस्थ २०२७ साठी वाहतूक नियोजन शास्त्रीय पद्धतीने करण्यावर भर आहे. सर्व पार्किंग जागांची प्रत्यक्ष पडताळणी आणि डिजिटल नोंदणी वेळेत पूर्ण झाल्यास अंमलबजावणीच्या टप्प्यावर अडचणी टाळता येतील.”

सिंहस्थ २०२७ च्या पार्श्वभूमीवर पार्किंग व वाहतूक व्यवस्थापनाचा आराखडा अंतिम करण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वयाची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790