नाशिकमधील नवीन रिंग रोडचे व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई। दि. ६ ऑक्टोबर २०२५: कुंभमेळा श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नाशिकमधील नवीन रिंगरोडचे काम पूर्ण करण्याबरोबरच साधू ग्राम/टेंटसीटीसाठीची भूसंपादनाची कामेही गतीने पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 आढावा बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पणनमंत्री जयकुमार रावल, नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेशकुमार, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सादरीकरणाव्दारे नियोजनाची माहिती दिली. जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त करिश्मा नायर हे उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  सलग चार दिवस बँका बंद राहणार का ? जाणून घ्या सविस्तर…

गर्दीचे नियोजन, कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे तसेच रस्त्यांची व मलनि:स्सारणाची कामे वेगाने पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे श्री. गेडाम यांनी सांगितले.

नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहील यावर कटाक्षाने भर द्यावा:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा हा धार्मिक श्रद्धेचे प्रतीक आहे .संपूर्ण कुंभमेळा कालावधीत रामकुंडात आणि नेहमीसाठीच नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहील हे कटाक्षाने पहावे. मलनि:स्सारणाची कामे प्राधान्याने हाती घेवून पूर्ण करण्यात यावीत. विमानतळे आणि रेल्वे सुविधांची कामेही गतीने पूर्ण करावीत. नाशिकमधील नवीन रिंग रोडचे काम त्वरित पूर्ण करावे. या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक निधी त्वरित मंजूर करुन घ्यावा. इतर रस्त्यांची कामेही त्वरित हाती घेण्यात यावी. कामे अपूर्ण राहिल्याने नागरिकांची गैरसोय होता कामा नये याकडे लक्ष द्यावे. विविध आखाड्यांशी चर्चा करून त्यांच्या गरजेनुसार साधूग्राममध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. सीसीटीव्ही कॅमेरे प्रणाली केंद्रीकृत पद्धतीने तयार करण्यात यावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ‘एआय’च्या विविध पर्यायांचा वापर करण्यात यावा. ‘मार्व्हल’चाही उपयोग करून घेण्यात यावा. पोलिसांच्या निवासासाठीची व्यवस्था प्राधान्याने करण्यात यावी. द्वारका सर्कल येथील कामे त्वरित पूर्ण करावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेव्दारे बस सेवेचे नियोजन करण्यात यावे. वाहनतळांच्या ठिकाणी भंडारा/लंगरची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश श्री. फडणवीस यांनी दिले.

प्रचार-प्रसिद्धीसाठी ‘डिजिटल कुंभ’ संकल्पना:
कुंभमेळ्याच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी ‘डिजिटल कुंभ’ ही संकल्पना राबविण्यात यावी. प्रचार प्रसिध्दीसाठी स्वतंत्रपणे वेगळा आराखडा तयार करून नियोजन करण्यात यावे. कुंभमेळा कामांसंदर्भात कोणत्याही प्रकारची नकारात्मक प्रसिद्धी होत असल्यास संबंधित विभागांनी यासंदर्भातील वस्तूनिष्ठ खुलासा त्वरित संबंधित माध्यमांना द्यावा. कुंभमेळ्यासाठीच्या आवश्यक कामांसाठी जिल्हास्तरावरील नोकरभरतीलाही गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुंभमेळ्यासाठीची विविध कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. तयार होणाऱ्या सुविधा या दीर्घकालीन असाव्यात असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कुंभमेळ्यासाठीची सर्व कामे दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. पोलिसांच्या निवासव्यवस्थेसही प्राधान्य द्यावे, असे श्री. पवार यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, कुंभमेळा कालावधीत व नेहमीसाठीही नदीपात्रातील पाणी शुद्ध राहील यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने नियोजन करण्यात यावे.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले, अनेक तीर्थक्षेत्रे कुंभमेळ्याच्या परंपरेशी जोडलेली असल्याने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जवळपासच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांनाही गती देण्यात यावी.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790