कुंभमेळा २०२७: नाशिक रिंगरोडच्या ३ हजार ९५४ कोटींच्या नागरी कामांना प्रशासकीय मान्यता

नाशिक। दि. ११ मार्च २०२६: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने नाशिक शहरातील पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठी ६९.१५ कि.मी. लांबीच्या नाशिक रिंगरोडच्या नागरी बांधकाम कामांसाठी ३ हजार ९५४ कोटी रुपयांच्या खर्चास सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मान्यता दिली. यासह सिंहस्थ काळात विविध उपक्रम, मोहिमा व सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावी आणि सुसंगत पद्धतीने पोहोचण्यासाठी योग्य संवाद, सर्जनशील मल्टिमिडिया निर्मिती आणि डिजिटल माध्यमांचा समन्वित वापर करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे दुरदृश्यप्रणालीद्वारे, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील बैठकीस उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री.गेडाम म्हणाले, या प्रकल्पासाठी जमीन संपादनास यापूर्वीच प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. प्रस्तावित नाशिक रिंगरोडची एकूण लांबी ६९.१५ कि.मी. असून डीआरडीओ जंक्शन (राष्ट्रीय महामार्ग ६०) पासून सुरू होऊन शहराला वळसा घालत पुन्हा त्याच महामार्गाला जोडली जाणार आहे. या चार ते सहा पदरी मार्गात पाच मोठे पूल, दोन रेल्वे उड्डाणपूल, आठ वाहन अंडरपास तसेच सेवा रस्त्यांचा समावेश आहे. हा मार्ग चार राष्ट्रीय महामार्ग व चार राज्य महामार्गांना जोडणारा असून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास तसेच सिंहस्थ काळात अखंड वाहतूक सुलभ करण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांची भरती

याशिवाय यात्रेकरू सुविधा, संपर्क व्यवस्था व पायाभूत सुविधांशी संबंधित विविध कामांसाठीही १९० कोटी रुपयांहून अधिक निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. नाशिक येथील रामकुंड तसेच त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ येथे ध्वजस्तंभ उभारण्यासाठी ७ कोटी ९ लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रह्मगिरी पर्वतावरील लहान व मोठी प्रदक्षिणा मार्ग विकास तसेच अंजनेरी येथे इको-टुरिझम विकासासाठी २३ कोटी १२ लक्ष रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करावीत- अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर

टाकळी परिसरातील गोदावरी–नंदिनी नदी संगमाच्या उजव्या काठावर ३०० मीटर घाट बांधण्यासाठी ४४ कोटी ५३ लक्ष रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली असून यामुळे नदीकाठावरील सुविधा मजबूत होणार आहेत. पंचवटी परिसरातील कर्मा हाइट्स ते तपोवन एसटीपी, सर्वे क्रमांक ३५७ व नांदूर गावापर्यंतच्या रस्ते विकासासाठी २० कोटी २२ लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. सिंहस्थ २०२७ साठी वाहतूक नियोजन वैज्ञानिक पद्धतीने करण्यासाठी आयआयएम नागपूरमार्फत एकात्मिक गतिशीलता आराखडा (इंटिग्रेटेड मोबिलिटी प्लॅन) तयार करण्यासाठी १० कोटी २४ लक्ष रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाच्या स्थलांतर व बळकटीकरणासाठी तसेच आवश्यक सुधारणा कामांसाठी १ कोटी ७२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. कावनई (कपिलधारा तीर्थ) येथे विकासकामांसाठी २७ कोटी ४७ लक्ष रुपये, चक्रतीर्थ (चाकोरे–बेझे परिसर) येथे २४ कोटी १० लक्ष रुपये तसेच टाकेद येथे पायाभूत सुविधा विकासासाठी २१ कोटी ९१ लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तुमच्या दुकानात बालकामगार काम करतोय? होऊ शकते कठोर कारवाई !

बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी संबंधित विभागांना सर्व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामे निश्चित कालमर्यादेत सुरू करण्याचे निर्देश दिले. सिंहस्थ २०२७ पूर्वी सर्व महत्त्वाची पायाभूत कामे पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध आणि समन्वित प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. विशेषतः रिंगरोड प्रकल्पामुळे नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेला दीर्घकालीन दिलासा मिळेल तसेच भविष्यातील शहरी गतिशीलता अधिक सुसंगत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल पाटील (दुरदृश्यप्रणालीद्वारे), उपवनसंरक्षक (पूर्व) सिद्धेश सावर्डेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, नियोजन विभागाचे सहसंचालक बाबुलाल पाटील , योगेंद्र चौधरी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, राहुल पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790