
नाशिक। दि. ६ ऑक्टोबर २०२५: रस्त्यावर अडवून जबरी लूट करणारे दोन सराईत गुन्हेगार पंचवटी पोलिसांनी जेरबंद केले. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अटकेतील दोघांवर लूटमार, हाणामारीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पहिली घटना अमर चौक येथे अशोक मुर्तडक यांच्या घराजवळ घडली. फिर्यादी मंगेश विजय बेंडकुळे हे द्वारका येथून दुचाकीने घरी जात असताना त्याच्या ओळखीचा किरण भडांगे याने आवाज देऊन मंगेश यास थांबवत तुझी दुचाकी मला दे म्हणून गळ घातली. मंगेशने नकार देताच त्याच्यासोबत असलेला गौरव कैलास गदावी यास राग आला. त्यानंतर किरण, गौरव, भूषण वाघ, भरत यांनी मंगेश बेंडकुळे याच्या हातावर वार केले. त्यानंतर सर्वच संशयित आरोपी फिर्यादी मंगेशची दुचाकी तसेच खिशातील आठ हजार रुपये लुटून पसार झाले. गौरव गदावी हा सराईत गुन्हेगार आहे.
चांदीची चेन लुटून पसार झालेला अटकेत:
लूटमारीचा दुसरा गुन्हा पंचवटी भागातील गणेशवाडीत शनिवारी (दि. ४) रात्री ९:४५ वा. घडला. फिर्यादी मयूर चव्हाण यांचा रस्ता अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील १५ हजारांची २० ग्रॅम वजनाची चांदीची चेन खेचून प्रमोद विनोद चारोस्कर याने पलायन केले. चारोस्कर यास अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पंचवटी पोलिस ठाण्यात तीन गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत.
![]()
