
नाशिक। दि. ५ ऑक्टोबर २०२५: नाशिक शहरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले असले तरीही गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाहीये… सातपूर परिसरातील ऑरा या रेस्टॉरंट येथे आज पहाटे २.३० वाजेच्या सुमारास एका युवकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी ३ संशयित आरोपीना अटक करण्यात आली आहे.
याबाबबत पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सातपूरच्या आयटीआय सिग्नलजवळ ऑरा बार अँड रेस्टॉरंट आहे. याठिकाणी युवकांचे आपापसात भांडण सुरु होते. या आपापसातील भांडणांमध्ये स्वत:ची दहशत माजविण्याच्या उद्देशाने वरुण तिवारी या युवकावर संशयित प्रिन्स सिंग याने धारदार चाकूने वार केले व संशयित शुभम पाटील उर्फ भुरा याने रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून वरुणला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही गोळी वरूण याच्या मांडीवर लागली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेनंतर संशयित आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
या घटनेबाबत सातपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शांताराम भडांगे यांनी स्वतः फिर्याद दिली असून याप्रकरणी भूषण प्रकाश लोंढे, शुभम पाटील उर्फ भुरा, प्रिन्स सिंग, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजित अडांगळे, राहुल गायकवाड, सनी विठ्ठलकर, शुभम निकम तसेच वेदांत चाळगे यांच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे करत आहेत. (सातपूर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३१३/२०२५)
![]()
