नाशिक: ४० किलो गांजाप्रकरणी दोघांना १० वर्षांची सक्तमजुरी

नाशिक। दि. १० मार्च २०२६: मुंबईनाका पोलिस ठाणे हद्दीत ४० किलो ७०० ग्रॅम गांजाची तस्करी केल्याप्रकरणी दोन आरोपींना नाशिक जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. हा निकाल जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय क्रमांक ४ चे न्यायाधीश श्री. एस. बी. भंसाली यांनी दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून २०२० रोजी वडाळा पाथर्डी रोड येथे हा गुन्हा उघडकीस आला होता. या प्रकरणात शफीक सत्तार शाह (वय ३०, रा. वडाळागाव, नाशिक) आणि गयाशोद्दीन नियाजुद्दीन शेख (वय ३४, रा. म्हाडा बिल्डिंग मागे, वडाळागाव, नाशिक) यांना अटक करण्यात आली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: हंगामातील उच्चांकी ३९.९ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद

आरोपींनी संगनमताने आपल्या ताब्यातील टाटा इंडिगो (एमएच ०२ सीडी १५४४) या वाहनातून विक्रीसाठी गांजाची वाहतूक केल्याचा आरोप होता. पोलिसांनी या कारवाईत ४० किलो ७०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला होता. या मुद्देमालाची किंमत सुमारे ११ लाख ३२ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी ३८५ किमी फायबर नेटवर्क; नाशिकच्या डिजिटल पायाभूत सुविधांना बळ

या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन नेमणूक मुंबईनाका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धर्मराज बांगर यांनी केला होता.

न्यायालयाने सादर करण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब व तपासातील बाबी विचारात घेत आरोपींना दोषी ठरवले. त्यानुसार आरोपींना प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातून एनडीएसाठी दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. रवींद्र निकम यांनी कामकाज पाहिले. तर अभियोजन समन्वयक म्हणून प्रभारी अधिकारी प्रदीप गायकवाड यांनी सहकार्य केले. मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तपास व पाठपुरावा करून दोषारोप सिद्ध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790