नाशिक: गणेशोत्सव २०२६ ठरणार महासिंहस्थ जनजागृतीचे व्यासपीठ; कुंभमेळा प्राधिकरणाकडून ‘गणेश मंडळ स्पर्धेचा’ प्रस्ताव

नाशिक। दि.१४ ऑगस्ट २०२६: महासिंहस्थ कुंभमेळा २०२७ची तयारी वेग घेत असताना, गणेशोत्सवाच्या माध्यमातून महासिंहस्थचा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची संकल्पना नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने पुढे आणली आहे. ‘महासिंहस्थ गणेश मंडळ स्पर्धा’ या प्रस्तावित उपक्रमाच्या माध्यमातून गणेश मंडळांना महासिंहस्थच्या जनजागृती आणि नागरिक सहभागाचे माध्यम बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी शहर व जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस नाशिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, तहसीलदार योगेश चंद्रे तसेच शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गणेशोत्सवातील मंडळांची व्यापक पोहोच लक्षात घेऊन त्यातून महासिंहस्थची आध्यात्मिक, सांस्कृतिक, पर्यावरणपूरक आणि आधुनिक संकल्पना नागरिकांपर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये मंडळांकडून महासिंहस्थविषयक देखावे, सजावट, माहितीपर मांडणी, जनजागृती उपक्रम तसेच सामाजिक व सामुदायिक उपक्रम राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये शुक्रवारी (दि. १४ ऑगस्ट) रोजगार मेळाव्याचे आयोजन

सात विषयांवर सर्जनशील मांडणी:
प्रस्तावित ‘महासिंहस्थ गणेश मंडळ स्पर्धा’मध्ये कुंभाचे अध्यात्मिक महत्त्व व अमृत, नाशिक-त्र्यंबकेश्वरचा वारसा, भविष्यासाठी सज्ज महासिंहस्थ, हरित व शाश्वत कुंभ, सर्वसमावेशक कुंभ, सेवा व समर्पण आणि नाशिक – आध्यात्मिक राजधानी या सात विषयांभोवती मंडळांना उपक्रम सादर करता येणार आहेत.

यातून महासिंहस्थचा संदेश केवळ पारंपरिक कुंभक्षेत्रापुरता मर्यादित न ठेवता नाशिकच्या विविध भागांतील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः युवक, स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक घटकांना या उपक्रमाशी जोडण्यावर भर राहणार आहे.

खर्चापेक्षा कल्पकता आणि सहभागाला प्राधान्य:
प्रस्तावित उपक्रमात केवळ मोठ्या किंवा खर्चिक सजावटींना प्राधान्य न देता कल्पना, सर्जनशीलता, नागरिकांचा सहभाग आणि शाश्वततेला महत्त्व देण्याची भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे लहान मंडळांनाही सहभागी होण्याची संधी मिळावी, यावर भर देण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाने बनावट वर्कऑर्डर; तीन कोटींची फसवणूक उघड; दोघांना अटक

मूल्यमापनासाठी महासिंहस्थच्या विषयाशी सुसंगतता, कल्पकता, अंमलबजावणीची गुणवत्ता, नागरिकांचा सहभाग व परिणाम तसेच शाश्वतता आणि पुनरावृत्तीची क्षमता या बाबींचा विचार करण्याचे प्रस्तावित आहे.

पाच श्रेणींमध्ये प्रत्येकी दोन लाखांचे पारितोषिक:
प्रस्तावित स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कुंभविषयक गणेशोत्सव सजावट, सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक मांडणी, सर्वोत्कृष्ट शाश्वत गणेश मंडळ, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान व नवोपक्रम सादरीकरण आणि सर्वोत्कृष्ट सामुदायिक सहभाग उपक्रम अशा पाच श्रेणी असतील. प्रत्येक श्रेणीसाठी दोन लाख रुपयांचे पारितोषिक, तर नावीन्यपूर्ण संकल्पनेसाठी परीक्षक मंडळाचा विशेष पुरस्कार पाच लाख रुपयांचा प्रस्तावित आहे.

या माध्यमातून गणेशोत्सव हा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव न राहता महासिंहस्थसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागाचे व्यासपीठ बनविण्याचा प्रयत्न आहे. महासिंहस्थ गणेश मंडळ स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम मुदत १० सप्टेंबर २०२६ आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात सर्वत्र ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवावे - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

मंडळांच्या सूचनांनंतर अंतिम स्वरूप:
बैठकीत गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी प्रस्तावित उपक्रमाबाबत विविध सूचना व मते मांडली. सहभागी मंडळांची नोंदणी, गणेश मंडळ महासंघ आणि स्थानिक संस्थांच्या माध्यमातून संपर्क, मार्गदर्शन सत्रे, महासिंहस्थविषयक माहिती व सर्जनशील साधनसामग्री उपलब्ध करून देणे, तसेच उपक्रमांचे दस्तऐवजीकरण व परीक्षण अशा बाबींचा प्रस्तावित अंमलबजावणी आराखड्यात समावेश आहे.

गणेश मंडळांच्या प्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या सूचना आणि चर्चेच्या आधारे उपक्रमाचे अंतिम स्वरूप व पुढील कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या व्यापक लोकसहभागाचा उपयोग करून महासिंहस्थबाबत नागरिकांमध्ये आगाऊ जनजागृती, सहभाग आणि आपलेपणाची भावना निर्माण करण्यासोबतच अध्यात्म, परंपरा, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि सामाजिक सहभाग यांची सांगड घालण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790