नाशिक: रेस्टॉरंट-हॉटेलमध्ये ‘चीज अ‍ॅनालॉग’ वापराबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे बंधनकारक

नाशिक। दि. २२ एप्रिल २०२६: पनीर दुग्धजन्य हा भारतीय आहारतील महत्वाचा घटक आहे. काही रेस्टॉरंट/ हॉटेल्स व फास्ट फूड विक्रेते या आस्थापनांमध्ये अन्न पदार्थ तयार करातांना पनीर ऐवजी चीज ॲनॉलॉग हा पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ग्राहकांची दिशाभूल होऊ नये आणि अन्न सुरक्षेचे मानक काटेकोरपणे पाळले जावे यासाठी रेस्टॉरंट, कॅटरर्स, हॉटेल्स व फास्ट फूड विक्रेते यांनी अन्नपदार्थ तयार करताना ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास त्याबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे बंधनकारक आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन (महाराष्ट्र राज्य) मुंबई चे अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर डूबे- पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  उन्हाळी सुट्ट्यांसाठी रेल्वे विशेष गाड्या चालविणार

अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न मिळावे हा प्रमुख उद्देश आहे. पनीरमध्ये प्रथिने, कॅल्शियम व इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. मात्र ‘चीज अ‍ॅनालॉग’ हा पदार्थ दूधाव्यतिरिक्त इतर घटकांपासून तयार केला जातो आणि तो पनीरसारखा दिसत असला तरी तो पनीर नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा व मानके (अन्न पदार्थ मानके व अन्न मिश्रित पदार्थ) विनियम, 2011 नुसार ‘पनीर’ हा केवळ दूधापासून बनवलेला पदार्थ आहे. तर ‘चीज अ‍ॅनालॉग’ हा वनस्पती तेल, स्टार्च, इमल्सिफायर आदी घटकांपासून तयार होतो. काही आस्थापनांमध्ये ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून ग्राहकांना त्याची माहिती दिली जात नाही. काही ठिकाणी ‘पनीर’ किंवा ‘चीज’ या नावाखाली ‘अ‍ॅनालॉग’ पदार्थ विकले जात असल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे या दोन्ही पदार्थांमध्ये मूलभूत फरक असून ग्राहकांना याबाबत स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात २० ते २४ एप्रिलदरम्यान वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

लेबलिंग व माहिती देणे बंधनकारक
अन्न सुरक्षा व मानके (लेबलिंग अँड डिस्प्ले) नियम, 2020 नुसार अन्नपदार्थ विक्री करताना त्यातील घटकांची माहिती, पोषणमूल्ये व आवश्यक सूचना देणे बंधनकारक आहे. तसेच रेस्टॉरंट, हॉटेल्स व फास्ट फूड विक्रेत्यांनी ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास मेन्यू कार्ड/डिस्प्ले बोर्डवर स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे.

ग्राहकांनी घ्यावयाची काळजी:
ग्राहकांनी पनीर किंवा चीज खरेदी करताना उत्पादनावरील लेबल नीट वाचावे, ‘अ‍ॅनालॉग’ असा उल्लेख आहे का हे तपासावे. सैल पनीर खरेदी करताना त्याची शुद्धता खात्री करून घ्यावी आणि बिल घ्यावे. हॉटेलमध्ये ऑर्डर देताना पदार्थामध्ये पनीर आहे की ‘चीज अॅनालॉग’ याची खात्री करावी.

🔎 हे वाचलं का?:  दूरसंचार आराखडा; कुंभमेळा प्राधिकरणाची प्रमुख दूरसंचार कंपन्यांसोबत बैठक

नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई:
या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच अन्न व्यवसायिकांनी परवाना घेताना दिलेले संपर्क तपशील अद्ययावत ठेवणे बंधनकारक आहे.

तक्रारीसाठी हेल्पलाईन:
ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांनी प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न सुरक्षा आयुक्त श्री. अभिजित डुबे-पाटील यांनी केले आहे. अन्न व औषध प्रशासन ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असून अन्न क्षेत्रातील फसवणूक व दिशाभूल रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती आयुक्त श्री. डूबे- पाटील यांनी दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790