नाशिक: गंगापूर रोडवरील ‘या’ हॉटेलचा परवाना निलंबित; एफडीएची कारवाई !

नाशिक। दि. २० ऑगस्ट २०२६: गंगापूर रोड परिसरातील पंपिंग स्टेशन रोडवरील ‘मे. अवंती स्नॅक्स’ या आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. १९ ऑगस्टपासून हा निलंबन आदेश लागू करण्यात आला आहे.

मामा मुंगी मंगल कार्यालयाजवळील गंगानिवास सोसायटीतील शॉप क्रमांक ३ येथे असलेल्या या आस्थापनेची अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत अचानक तपासणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, नाशिक विभागाचे सहआयुक्त (अन्न) मंगेश माने आणि सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पर्यावरणपुरक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करावे- मंत्री पंकजा मुंडे

तपासणीदरम्यान आस्थापनेत अन्न सुरक्षा नियमांशी संबंधित अनेक त्रुटी निदर्शनास आल्या. कच्चा माल स्वीकारण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासण्याची कोणतीही प्रक्रिया आढळली नाही. तसेच कामगारांची आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्याचे समोर आले.

याशिवाय आस्थापनेत कीटक नियंत्रणासाठी आवश्यक पेस्ट कंट्रोलची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. परिसरातील स्वच्छता आणि देखभालीकडेही दुर्लक्ष झाल्याचे आढळले. भिंतींची आवश्यक रंगरंगोटी न करणे तसेच स्वच्छतेच्या नियमांचे पालन न केल्याच्या त्रुटीही तपासणीत नोंदवण्यात आल्या.

🔎 हे वाचलं का?:  रुग्णांसाठी मोठी बातमी! रविवारीही अपोलोमध्ये कन्सल्टेशन, डायग्नॉस्टिक्स आणि हेल्थ चेक !

“नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकाला सवलत दिली जाणार नाही. नाशिक विभागातील विशेष तपासणी मोहीम यापुढे आणखी तीव्र करण्यात येईल,” असे अन्न व औषध प्रशासनाचे नाशिक विभागाचे सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी स्पष्ट केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790