नाशिक। दि. २० ऑगस्ट २०२६: नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यात भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच असून, बुधवारी (दि. १९ ऑगस्ट) पेठ आणि सुरगाणा तालुक्यांतील काही भागांना सौम्य हादरे जाणवले. पेठ तालुक्यातील भूकंपाची तीव्रता मेरी येथील भूकंपमापन केंद्रावर २.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली.
पेठ तालुक्यात सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन आणि एकदरे परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. अचानक जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या धक्क्यांमध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
गेल्या महिनाभरापासून जिल्ह्याच्या आदिवासी भागात अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, बुधवारी पुन्हा धक्के जाणवल्याने भीतीत भर पडली आहे.
दरम्यान, सुरगाणा तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोरगाव आणि आसपासच्या गावांमध्ये दुपारी सुमारे ३.३७ वाजता दोन भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या वेळी घरातील वस्तू तसेच दरवाजे आणि खिडक्या हलल्याचे नागरिकांनी सांगितले.
भूकंपाच्या धक्क्यांनंतर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()


