नाशिक जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात ६८.८ टक्के पाऊस; येवला-नांदगावात पावसाची तूट

नाशिक। दि. १८ ऑगस्ट २०२६: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर काहीसा मंदावल्याचे चित्र नाशिक जिल्ह्यात दिसून येत आहे. १७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ६८.८ टक्के पावसाची नोंद झाली असून, दिंडोरी, बागलाण, सुरगाणा आणि निफाड या चार तालुक्यांनी महिन्याच्या सरासरी पावसाची पातळी ओलांडली आहे. दुसरीकडे येवला आणि नांदगावमध्ये अपेक्षित पावसाच्या निम्म्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अनैतिक संबंधात अडधळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने केली हत्या; मृतदेह कसारा घाटात फेकला

ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील १५ तालुक्यांसाठी सरासरी १४६.४ मिमी पाऊस अपेक्षित आहे. त्यापैकी १७ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्षात १००.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्याची एकूण पावसाची सरासरी ६८.८ टक्क्यांवर आहे. उर्वरित ११ तालुके अद्याप त्यांच्या मासिक सरासरीपासून दूर आहेत. महिनाअखेरीस, म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यास या तालुक्यांमधील तूट भरून निघण्याची शक्यता आहे.

दिंडोरीत सर्वाधिक पाऊस:
दिंडोरी तालुक्यात ऑगस्टअखेर १०१.९ मिमी पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत १५४.४ मिमी, म्हणजेच सरासरीच्या १४२.७ टक्के पाऊस झाला आहे. बागलाणमध्ये १३८.२ टक्के, सुरगाण्यात १०६.५ टक्के आणि निफाडमध्ये १०१.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या चार तालुक्यांनी ऑगस्टची अपेक्षित पावसाची सरासरी आधीच ओलांडली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महासिंहस्थासाठी ओझर विमानतळ सज्ज होणार; नवे टर्मिनल मार्चअखेर, विमानतळापासून महामार्गापर्यंत वाहतूक सुविधांची जुळवाजुळव

येवला-नांदगावमध्ये मोठी तूट:
पूर्व भागातील येवला आणि नांदगाव तालुक्यांमध्ये मात्र पावसाची स्थिती तुलनेने चिंताजनक आहे. येवल्यात ऑगस्ट महिन्यात ५३.४ मिमी पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ २०.७ मिमी, म्हणजे ३८.८ टक्के पाऊस झाला आहे. नांदगावमध्ये महिन्याची सरासरी ६४ मिमी असताना आतापर्यंत २९.६ मिमी, म्हणजे ४६.६ टक्के पाऊस नोंदवला गेला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा 'या' दिवशी बंद राहणार

ऑगस्टमधील तालुकानिहाय पाऊस (टक्क्यांमध्ये):
दिंडोरी १४२.७, बागलाण १३८.२, सुरगाणा १०६.५, निफाड १०१.१, देवळा ९५.१, त्र्यंबकेश्वर ८६.७, मालेगाव ७८.६, चांदवड ७६.४, पेठ ७३.४, कळवण ६३.४, नाशिक ६०.३, इगतपुरी ४९.१, सिन्नर ४८.१, नांदगाव ४६.६, येवला ३८.८, सरासरी ६८.८

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790