नाशिक: अनैतिक संबंधात अडधळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने केली हत्या; मृतदेह कसारा घाटात फेकला

नाशिक। दि. १८ ऑगस्ट २०२६: प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता व्यक्तीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेने या हत्येचा उलगडा केला. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या चौकशीत मृतदेह कसारा घाटातील जंगल परिसरात फेकल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेहही शोधून काढला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, वसंत गोरखनाथ सातपुते (वय ४०, रा. स्वराज्य नगर, पाथर्डी फाटा, नाशिक) हे ५ ऑगस्टपासून बेपत्ता होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ कडूनही सुरू होता.

दरम्यान, पोलिस हवालदार नाझीमखान पठाण आणि अंमलदार मुक्तार शेख यांना गुप्त माहिती मिळाली की, बेपत्ता वसंत सातपुते यांची हत्या करण्यात आली असून या प्रकरणातील संशयित शालीमार परिसरात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना देण्यात आल्यानंतर पोलिस पथकाने तातडीने कारवाई केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा 'या' दिवशी बंद राहणार

सीबीएस परिसरात शोध घेत असताना संशयित महिला आणि पुरुष पोलिसांच्या हाती लागले. चौकशीत त्यांची ओळख हसीना हबीब शेख (वय ४४), साहिल रफिक शहा (वय २३), मोईन मुक्तार शहा (वय २४) आणि सरफराज अबरार सैय्यद (वय २२) अशी पटली.

चौकशीत हत्येची कबुली:
पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली असता, वसंत सातपुते हे हसीना शेख आणि साहिल शहा यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याचा दावा त्यांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार ६ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ३ वाजता राहत्या घरी साहिलच्या मदतीने वसंत सातपुते यांची चाकूने गळा चिरून हत्या केल्याची कबुली संशयितांनी दिल्याचे पोलिसांनी नमूद केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घेण्याचे आवाहन

हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो गोणीत भरून इरटिगा वाहनातून कसारा घाटाच्या दिशेने नेण्यात आला. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने मृतदेह घाटातील जंगल परिसरात फेकून दिल्याची माहिती चौकशीत समोर आली.

घनदाट जंगलात मृतदेहाचा शोध:
या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि त्यांच्या पथकासह पोलिस उपनिरीक्षक रमीज शेख यांच्या पथकाने कसारा घाटातील संबंधित परिसरात शोधमोहीम राबवली. घनदाट जंगलात शोध घेतल्यानंतर गोणीत भरलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला.

मृतदेह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ, इंदिरानगर पोलिस ठाणे करीत आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासामुळे सुरुवातीला अपहरण म्हणून नोंद झालेल्या प्रकरणामागील कथित हत्येचे गूढ उकलले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात ६८.८ टक्के पाऊस; येवला-नांदगावात पावसाची तूट

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क.१ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दतात्रय पोटे, रमीज शेख, श्रेणी. पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाठ, नाझीमखान पठाण, मुक्तार शेख, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, आप्पा पानवळ, उत्तम पवार, अमोल कोष्टी, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, देविदास ठाकरे, मनिषा सरोदे, अनुजा येलवे, राहुल पालखेडे, महेश साळुंके, रोहिदास लिलके, शर्मीला कोकणी, गोरक्ष साबळे, कैलास चव्हाण, योगीराज गायकवाड, श्रीकांत सुर्यवंशी, चालक पोलीस हवालदार सुक्राम पवार, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार, महिला सहायक पोलीस निरीक्षक जया तारडे, तांत्रिक विश्लेषण विभाग, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांच्या टीमने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790