‘वनार्टी’च्या मोफत ऑनलाईन प्रशिक्षणासाठी अर्जांना मुदतवाढ; जेईई, नीट व एमएचटी-सीईटी विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत अर्जाची संधी

नाशिक। दि. २५ मे २०२६: राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) मार्फत जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी राबविण्यात येणाऱ्या मोफत ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी १५ जून २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन वनार्टीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

सन २०२६-२८ या शैक्षणिक सत्रासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांतील पात्र विद्यार्थ्यांकडून जेईई, नीट व एमएचटी-सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेऊन अर्जाची अंतिम मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

विमुक्त जाती (व्हीजे-ए) तसेच भटक्या जमाती ब, क व ड (एनटी-बी, एनटी-सी व एनटी-डी) या नॉन-क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी वनार्टी संस्था विविध उपक्रम राबवत आहे. गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षणाबरोबरच विद्यावेतनाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

याबाबत राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा वनार्टीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी समाधान व्यक्त केले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा योजनांची आवश्यकता असून, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या यशाच्या संधी अधिक मजबूत होतील, असे त्यांनी नमूद केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वनार्टी करीत आहे. व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ‘महाज्योती’ आणि ‘वनार्टी’ या दोन्ही संस्थांकडे स्वतंत्रपणे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असून, निवड झाल्यानंतर कोणत्याही एका संस्थेकडून लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सज्ज व्हावे, असे आवाहनही श्री. वावगे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790