Amazon

नाशिक: कागदी टपालाला आळा; ई-ऑफिसचा प्रभावी वापर करा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

नाशिक। दि. २३ सप्टेंबर २०२६: कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक व कार्यक्षम करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालये व शाखांनी ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करावा तसेच कागदी स्वरूपातील टपाल व रिसिप्ट/पावत्यांचा वापर शक्यतो पूर्णतः टाळावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात २२ सप्टेंबर रोजी झालेल्या शाखाप्रमुखांच्या बैठकीत ई-ऑफिस प्रणालीच्या वापराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित असतानाही काही कार्यालयांकडून रिसिप्ट/पावत्या कागदी स्वरूपात टपाल शाखेमार्फत पाठविल्या जात असल्याने त्याच कामाची नोंद पुन्हा करण्याची आवश्यकता निर्माण होते. त्यामुळे मनुष्यबळ व वेळेचा अपव्यय होऊन कामकाजात विलंब होत असल्याचे निदर्शनास आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमाचे आज (दि. २२) आयोजन; विनामूल्य प्रवेश

त्यानुसार, कोणत्याही शाखेला कागदी स्वरूपातील रिसिप्ट टपाल शाखेमार्फत पाठवू नयेत. प्राप्त होणाऱ्या कागदी रिसिप्टचे संबंधित शाखांनी आवश्यकतेनुसार ई-ऑफिस प्रणालीमध्ये स्कॅन करून अभिलेख ठेवावेत. टपाल शाखेने दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कागदी रिसिप्ट सुरक्षित जतन करण्यासाठी द्वितीय अभिलेख कक्षाकडे हस्तांतरित कराव्यात.

एखाद्या शाखेला प्रकरणाच्या कामकाजासाठी मूळ कागदी रिसिप्टची आवश्यकता असल्यास, संबंधित शाखेने अभिलेख कक्षाकडून ती मागवावी. तसेच टपाल शाखेने क्षेत्रीय कार्यालयांकडून कोणत्याही स्वरूपातील कागदी रिसिप्ट स्वीकारू नयेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही शाखेनेही कागदी रिसिप्ट स्वीकारू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओढासह देवळाली रेल्वे स्थानकांची पाहणी

क्षेत्रीय कार्यालयांकडून पाठविण्यात येणारे सर्व टपाल ई-ऑफिस प्रणालीद्वारेच पाठविण्यात यावे. एखाद्या प्रकरणात विशिष्ट कायद्यानुसार कागदी दस्तऐवज प्राप्त होणे अत्यावश्यक असल्यास, अशा प्रकरणासाठी जिल्हाधिकारी, नाशिक यांची पूर्वमान्यता घेऊनच पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सामान्य शाखेस कळविण्यात यावे.

ई-ऑफिस प्रणालीचा वापर करणे सर्व कार्यालये व शाखांना अनिवार्य असून, कागदी स्वरूपातील रिसिप्ट/पावत्यांचा वापर शक्यतो पूर्णतः टाळावा, असेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. सर्व शाखाप्रमुख तसेच क्षेत्रीय कार्यालय प्रमुखांनी या सूचनांचे तात्काळ व काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी दिले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790